Maharashtra Government approves ₹84.23 crore as unseasonal rain compensation for 45,042 affected farmers across 21 districts, with financial assistance to be transferred directly through DBT. sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Farmer Relief: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्य शासनाकडुन ८४.२३ कोटींची मदत मंजूर; या ६ विभागांतील शेतकऱ्यांना होणार फायदा

Unseasonal Rain Compensation Maharashtra, Farmer Relief, DBT Assistance: राज्यातील अवकाळी पावसामुळे बाधित ४५,०४२ शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ८४.२३ कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे. २१ जिल्ह्यांतील लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे थेट बँक खात्यात निधी जमा होणार.

Sudesh Mitkar

DBT Assistance: राज्यात चालू वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना अखेर राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या अवकाळी संकटामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी पोटी ८४ कोटी २३ लाख ६५ हजार रूपयांच्या निधीला सरकारने मंजूरी दिली आहे. याबाबतचा अधिकृत शासन निर्णय महसूल व वन विभागाने जारी केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील ४५ हजार ४२ शेतकर्‍यांच्या चिंतेचा पूर ओसरण्यास मदत होणार असून, एकूण ३८ हजार ३५८ हेक्टर क्षेत्रावरील बाधित पिकांना ही आर्थिक मदत मिळणार आहे.

थेट बँक खात्यात पैसे जमा होणार

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषांनुसार ही मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे जमा केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाद्वारे लाभार्थ्यांची माहिती पडताळून ती संगणकीय प्रणालीवर नोंदवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे शेतकर्‍यांना मिळणारा हा मदतीचा निधी बँकांकडून कोणत्याही जुन्या कर्जवसुलीसाठी वळवता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश सरकारने दिले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना हा पैसा पूर्णपणे हातात मिळणार आहे. मदत वितरण पूर्ण झाल्यानंतर सर्व लाभार्थ्यांची यादी जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर पारदर्शकतेसाठी प्रसिद्ध केली जाणार आहे.

विभाग निहाय मदत:

अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका विदर्भातील अमरावती विभागाला बसला असून एकूण निधी पैकी सिंहाचा वाटा एकट्या याच विभागाच्या पदरात पडला आहे. अमरावती विभागातील २८ हजार ५७१ शेतकरी आणि ३० हजार ३२५ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी सर्वाधिक ६८ कोटी ९ लाख रूपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. त्याखालोखाल इतर विभागांचा विचार केला तर नागपूर विभागासाठी ६ कोटी ७ लाख रुपये, नाशिक विभागासाठी ५ कोटी २४ कोटी रुपये आणि पुणे विभागासाठी ३ कोटी ७३ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर छत्रपती संभाजीनगर विभागासाठी ७६ लाख ९९ हजार रुपये आणि सर्वात कमी म्हणजेच कोकण विभागासाठी ३२ लाख १४ हजार रूपयांच्या मदतीला सरकारने मंजूरी दिली आहे.

'या' २१ जिल्ह्यांतील शेतकर्‍यांना मिळणार लाभ

सरकारने जाहीर केलेल्या या पॅकेजचा लाभ राज्यातील एकूण २१ जिल्ह्यांतील बाधित शेतकर्‍यांना मिळणार आहे. यामध्ये खालील जिल्ह्यांचा समावेश आहे:

नागपूर, गोंदिया, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम. मराठवाड्यामधून नांदेड, धाराशिव, हिंगोली, लातूर तर उत्तर महाराष्ट्रामधून नाशिक, जळगाव, अहिल्यानगर. तसेच पश्चिम महाराष्ट्रातून पुणे, सांगली, कोल्हापूर आणि कोकणामधून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना ऐन पावसाळ्याच्या तोंडावर आणि खरीपाच्या हंगामात मिळालेली ही मदत अवकाळीने कंबरडे मोडलेल्या बळी राजाला काहीसा आर्थिक हातभार लावणारी ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT