Maharashtra folk dance omission sparks controversy: राज्याच्या नवीन शैक्षणिक आराखड्यानुसार तयार करण्यात आलेल्या इयत्ता सहावीच्या मराठी बालभारती पाठ्यपुस्तकावरून नवा वाद निर्माण झाला आहे. ‘लोकनृत्य’ या धड्यात महाराष्ट्रातील समृद्ध लोकनृत्य परंपरेला जवळपास पूर्णपणे डावलण्यात आल्याचा आरोप होत आहे.
विशेष म्हणजे, महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख बनलेल्या असंख्य लोकनृत्यांपैकी केवळ दिंडी नृत्य याचाच उल्लेख करण्यात आला असून गुजरात, पंजाब, छत्तीसगड आणि बिहारमधील लोकनृत्यांना मात्र सविस्तर माहिती आणि रंगीत चित्रांसह स्थान देण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ (Education) आणि सांस्कृतिक अभ्यासकांनी याबाबत तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. मराठी भाषा समितीच्या प्रमुखांची मनमानी आणि बालभारती (Balbharati) प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळेच हा प्रकार घडल्याची प्रतिक्रिया अनेकांकडून व्यक्त केली जात आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे-पाटील यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) विद्यार्थ्यांना येथील लोकपरंपरा, लोककला आणि लोकनृत्यांची ओळख करून देण्याऐवजी इतर राज्यांतील नृत्यप्रकारांवर भर देण्याचा निर्णय कोणी आणि कोणत्या उद्देशाने घेतला, याचा खुलासा व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच यासाठी जबाबदार असलेल्या तज्ज्ञांना मराठी भाषा समितीतून दूर करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
सहावीच्या मराठी बालभारतीतील दहावा धडा ‘लोकनृत्य’ हा भारतातील विविध राज्यांतील लोकनृत्य, वेशभूषा, वाद्ये आणि सांस्कृतिक परंपरांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र या धड्यात महाराष्ट्रातील लेझीम, लावणी, गोंधळ, कोळी नृत्य, पोवाडा, झिम्मा-फुगडी यांसारख्या लोकप्रिय लोकनृत्यांचा उल्लेख नसल्याने पालक, शिक्षक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून संताप व्यक्त केला जात आहे.
टीकाकारांच्या मते, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या राज्याच्या सांस्कृतिक वारशाची प्राथमिक माहिती देण्याऐवजी इतर राज्यांतील लोकनृत्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे अभ्यासक्रमाच्या मांडणीवरच प्रश्न उपस्थित होत आहेत.
या धड्याबाबत आणखी एक धक्कादायक दावा समोर आला आहे. लोकसाहित्य अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर यांच्या ‘लोकसाहित्य शब्दकोश’ आणि ‘भाषा संस्कृती’ या पुस्तकांतील मजकुराच्या आधारे हा धडा तयार करण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी मूळ मजकुरातील काही भाग वगळून उर्वरित मजकुरात सोयीनुसार बदल करण्यात आल्याचा आरोप होत आहे. डॉ. बाबर यांच्या नावाने धडा प्रकाशित करण्यात आला असला, तरी मूळ आशयात फेरबदल झाल्याचा दावा करण्यात येत असून यामुळे शैक्षणिक वर्तुळातही चर्चा रंगली आहे.
या वादावर प्रतिक्रिया देताना बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, सहावीच्या पुस्तकात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व म्हणून दिंडी नृत्याचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना देशातील विविध लोकनृत्यांची सर्वसमावेशक ओळख व्हावी, हा यामागील उद्देश आहे.
तसेच ज्या लोकनृत्यांचा धड्यात उल्लेख नाही, त्यांची माहिती शिक्षकांनी वर्गात विद्यार्थ्यांना द्यावी, अशी अपेक्षा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र या स्पष्टीकरणानंतरही वाद शमण्याची चिन्हे दिसत नसून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला अभ्यासक्रमात पुरेसे स्थान मिळाले आहे का, हा प्रश्न आता शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.