

Sindhudurg SSC Exam Scam : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा इथल्या दहावी परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्त परीक्षा व्यवस्थेलाच हादरा देणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
एका विद्यार्थ्याच्या नऊपैकी तब्बल सात विषयांच्या पुरवणी उत्तरपत्रिका अन्य व्यक्तीकडून लिहून घेतल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मार्च 2026 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेदरम्यान हा प्रकार घडल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, परीक्षा संपल्यानंतर इंग्रजी विषयाची उत्तरपत्रिका तपासणीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील एका शिक्षकाकडे गेल्यानंतर या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. मुख्य उत्तरपत्रिका आणि पुरवणीवरील हस्ताक्षर पूर्णपणे वेगळे असल्याचे शिक्षकांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने कोकण विभागीय मंडळाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची गंभीर दखल घेत बोर्डाने संबंधित विद्यार्थ्याचे (Student) सर्व नऊ विषयांचे पेपर मागवून तपासणी केली. तपासणीत सात विषयांच्या मुख्य उत्तरपत्रिका आणि पुरवण्यांमधील हस्ताक्षरात स्पष्ट तफावत आढळून आली. यानंतर भुईबावडा परीक्षा केंद्र संचालक, संबंधित सुपरवायझर शिक्षक तसेच परीक्षा प्रक्रियेशी संबंधित इतर कर्मचाऱ्यांना रत्नागिरी इथल्या कोकण विभागीय बोर्ड कार्यालयात चौकशीसाठी पाचारण करण्यात आले. तब्बल सात तास त्यांची सखोल चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, संबंधित विद्यार्थ्याचा निकाल सध्या राखून ठेवण्यात आला असून त्याच्यावर ‘रस्टिकेट’ची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चौकशीत हा विद्यार्थी भुईबावडा येथील एका माध्यमिक विद्यालयात शिकत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे त्याचे वडील दुसऱ्या एका माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत असल्याची माहितीही समोर आली आहे. मुलाला सेमी इंग्रजी शिक्षणासाठी भुईबावडा येथील शाळेत प्रवेश देण्यात आला होता.
या संपूर्ण प्रकारामुळे परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. सीसीटीव्ही देखरेखीखाली परीक्षा सुरू असताना उत्तरपत्रिका वर्गाबाहेर कशा गेल्या? त्या पुन्हा मुख्य उत्तरपत्रिकेला कशा जोडल्या गेल्या? यामध्ये नेमकी कोणाची भूमिका होती? असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून कोकण विभागीय बोर्डात सिंधुदुर्ग जिल्हा गुणवत्तेच्या बाबतीत अव्वल मानला जात असताना आता या प्रकारामुळे शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः वैभववाडी तालुक्यातील शिक्षण क्षेत्राच्या कारभारावर या घटनेमुळे संशयाची छाया निर्माण झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.