Maharashtra News : राज्याच्या अनेक भागात दुष्काळाच्या झळा तीव्र स्वरूपात जाणवू लागल्या आहेत. सरकारकडून युध्दपातळीवर पाण्याचे तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. याअंतर्गत आता राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील अनावश्यक कामांना ब्रेक लागणार आहे. नियोजन विभागाकडून याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
राज्य सरकारकडून दुष्काळग्रस्त भागातील टंचाई निवारणासाठी आवश्यक कामांना प्राधान्य देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये अपूर्ण जलवाहिन्या आणि संबंधित कामे पूर्ण करणे, पाणी गळती रोखणे, पाणीपुरवठा योजना, जलस्त्रोत सुरक्षित करणे आदी कामांना प्राधान्य देण्यास सांगण्यात आले आहे.
टंचाई निवारणाच्या प्राध्यान्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी टंचाई निवारणासाठी अत्यावश्यक नसलेल्या नवीन कामांचा आढावा घेण्यास घेण्यात सांगितले आहे. अशा कामांना तात्पुरती स्थगिती देण्याचे सूचित करण्यात आले आहे.
आढाव्यामध्ये प्रामुख्याने अत्यावश्यक नसलेली नवी उद्याने, सुशोभिकरणाची कामे, नवीन कार्यालयीन, प्रशासकीय इमारती बांधकाम, ग्रामीण व इतर जिल्हा मार्गावरील सर्व सिमेंट रस्ते, जन सुविधा व मोठ्या ग्रामपंचायत योजनेतील अंतर्गत सिमेंट रस्ते व गटार, नवीन नाले व पाणी जास्त लागणारी अन्य कामांचा विचार करता येईल, असे शासन निर्णयात म्हटले आहे.
किरकोळ दुरुस्तीच्या नावाखाली नवीन बांधकामे करण्यात येऊ नयेत, असेही ताकीद देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सुरू असलेल्या कामांना सरसकट स्थगिती देण्यात येऊ नये. अशा कामांना सक्षम प्राधिकाऱ्याने करारातील अटी, सार्वजनिक सुरक्षितता, कामाची सद्यस्थिती, आधीच झालेला खर्च, संभाव्य नुकसानभरपाई व पाण्याचा वापर विचारात घेऊन प्रकरणनिहाय निर्णय घ्यावा, असेही सरकारने म्हटले आहे.
निधीचा वापर टंचाईसाठी
तात्पुरती स्थगिती दिलेल्या किंवा पुढे ढकलेल्या कामांसाठी उपलब्ध असलेल्या निधीचा आढावा घेऊन त्या कामांसाठीचा निधी राज्यातील ३०४ दुष्काळी तालुक्यातील टंचाई निवारणाच्या प्राधान्याच्या कामासाठी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. टंचाईसाठी अत्यावरश्यक कामांना स्थगितीतून वगळण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.