Ladki Bahin Yojana Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याचा दावा करणारे संदेश सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या संदेशांसोबत काही अनधिकृत लिंकही प्रसारित केल्या जात आहेत. मात्र, ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याबाबत शासनाकडून अद्याप कोणतेही नवीन निर्देश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे लाभार्थी महिलांनी व्हायरल संदेशांवर विश्वास ठेवू नये आणि अनोळखी लिंकपासून सावध राहावे, असे आवाहन महिला व बालविकास विभागाने केले आहे.
लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी वेबसाइट पुन्हा सुरू झाल्याचा दावा करणारा मेसेज सध्या चर्चेत आहे. ज्या महिलांची अद्याप ई-केवायसी पूर्ण झालेली नाही, त्यांना पुन्हा प्रक्रिया करता येणार असल्याचे या संदेशात सांगितले जात आहे. अनेक महिलांची ई-केवायसी अपूर्ण असल्याने त्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे ई-केवायसीची सुविधा पुन्हा सुरू होणार का, याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील दाव्यांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, राज्यातील अनेक महिलांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते बंद झाल्याचे समोर आले होते. यामध्ये ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या महिलांची संख्या अधिक असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे ई-केवायसीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची मागणी लाभार्थी महिलांकडून केली जात होती. सत्ताधारी पक्षातील काही आमदारांनीही याबाबत सरकारकडे विनंती केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या मागणीबाबत सकारात्मक भूमिका असल्याची माहिती किसान सभेचे नेते अजित नवले यांनी दिली होती.
या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ई-केवायसी पुन्हा सुरू झाल्याचे संदेश प्रसारित होत आहेत. काही संदेशांमध्ये प्रक्रिया सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊन झाल्यामुळे ओटीपी येत नसल्याचाही दावा केला जात आहे. मात्र, या दाव्यांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाकडून ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याबाबत कोणतेही नवीन निर्देश देण्यात आलेले नाहीत.
त्यामुळे महिलांनी कोणत्याही अनोळखी किंवा अनधिकृत लिंकवर क्लिक करू नये. तसेच आधार क्रमांक, बँक खात्याचा तपशील, ओटीपी किंवा अन्य गोपनीय माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला अथवा संशयास्पद संकेतस्थळाला देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अशा लिंकच्या माध्यमातून वैयक्तिक आणि आर्थिक माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याने महिलांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.
ई-केवायसी प्रक्रियेबाबत शासनाकडून अधिकृत निर्णय किंवा नवीन सूचना प्राप्त झाल्यानंतर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, अकोला यांच्यामार्फत वृत्तपत्रे आणि अधिकृत माध्यमांतून लाभार्थी महिलांना माहिती दिली जाईल. तोपर्यंत सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेशांना प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. महिलांनी सतर्क राहून आपली वैयक्तिक आणि आर्थिक सुरक्षितता जपावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.