

नंदुरबार : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक विचार करेल, असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले आहे. योजनेच्या नामांतराचा निर्णय शासनस्तरावर घेतला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार याबाबत योग्य तो निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नंदुरबार येथे माध्यमांशी बोलताना अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या निर्मिती प्रक्रियेबाबत माहिती दिली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या मार्गदर्शनातून ही योजना तयार करण्यात आली होती. योजनेच्या स्वरूपात तिन्ही नेत्यांच्या सूचना आणि निर्णयांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
योजनेतील लाभार्थ्यांची वयोमर्यादा निश्चित करताना अजित पवार यांनी वयोश्री आणि श्रावणबाळ यांसारख्या योजनांचा संदर्भ दिला होता. त्यानुसार लाभार्थी महिलांसाठी वयोमर्यादा २१ ते ६५ वर्षे ठेवण्याची सूचना त्यांनी केली होती, असे तटकरे यांनी नमूद केले.
२१ वर्षांवरील अविवाहित तरुणींनाही योजनेत समाविष्ट करण्याची सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. सुरुवातीला १२०० रुपये असलेली आर्थिक मदत वाढवून १५०० रुपये करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला होता, अशी माहितीही अदिती तटकरे यांनी दिली.
लाडकी बहीण योजनेच्या निर्मितीत तत्कालीन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे योगदान असल्याचे सांगताना तटकरे यांनी या तिघांना राज्यातील महिलांचे ‘तीन लाडके भाऊ’ असे संबोधले गेले होते, याचाही उल्लेख केला.
योजनेला अजित पवार यांचे नाव देण्याबाबत विचारले असता, हा निर्णय सरकारच्या पातळीवर घेतला जाईल आणि त्यावर सकारात्मक विचार होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. अजित पवार यांच्याशी असलेल्या संबंधांबाबत बोलताना ते कालही आपले नेते होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील, असे वक्तव्य त्यांनी केले.
आता लाडकी बहीण योजनेच्या नामांतराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अद्याप योजनेचे नाव बदलण्याबाबत कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.