

Ladki Bahin Yojana Update : राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी असून पुन्हा एकदा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. सोमवार (ता.१६) पासून ई-केवायसी प्रक्रियेला सुरूवाच झाली असून पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणींचा सामना योजनेच्या लाभार्थी महिलांना करावा लागला आहे.
ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर आधार क्रमांक नोंदवल्यानंतर मोबाईलवर ओटीपी येणे आवश्यक आहे. मात्र, अनेक महिलांना ओटीपी मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे ई-केवायसीची प्रक्रिया अर्धवट राहत असून लाभार्थी महिलांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुसरीकडे, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार, याबाबतही अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही.
साम टिव्हीवर आलेल्या वृत्तानुसार, राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची माहिती अद्ययावत करण्यासाठी आणि पात्र लाभार्थ्यांची पडताळणी करण्याच्या उद्देशाने ई-केवायसी प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी ती वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी आधार कार्ड आणि संबंधित कागदपत्रे जवळ ठेवून आवश्यक माहिती अचूक भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मात्र, ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अधिकृत वेबसाइटवर तांत्रिक अडचणी जाणवू लागल्या आहेत. लाभार्थी महिला वेबसाइटवर जाऊन आधार क्रमांक टाकत आहेत. त्यानंतर आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवला जातो. मात्र, ओटीपीच प्राप्त होत नसल्याने अनेक महिलांना पुढील टप्पा पूर्ण करता येत नाही. परिणामी, ई-केवायसी करण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनही त्यांना यश मिळत नसल्याचे चित्र आहे.
पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने लाभार्थ्यांनी वेबसाइटवर एकाच वेळी प्रवेश केल्यामुळे सर्व्हरवर अतिरिक्त ताण निर्माण झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वेबसाइटचा वेग मंदावला असून काही वेळा वेबसाइट उघडण्यातही अडचणी येत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना या तांत्रिक समस्यांचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी अनेक महिला महा ई-सेवा केंद्र आणि सेतू केंद्रांवरही गर्दी करत आहेत. मात्र, केंद्रांवर गेल्यानंतरही ओटीपी मिळत नसल्याने महिलांना निराश होऊन परतावे लागत आहे. या तांत्रिक अडचणींमुळे केंद्र चालकांनाही लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण करून देण्यात अडथळे येत आहेत.
एकीकडे ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी महिलांची धावपळ सुरू आहे, तर दुसरीकडे वेबसाइटवरील तांत्रिक समस्यांमुळे त्यांचा वेळ वाया जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाने वेबसाइटवरील अडचणी तातडीने दूर करून ई-केवायसी प्रक्रिया सुरळीत करावी, अशी मागणी लाभार्थी महिलांकडून केली जात आहे. तसेच ऑक्टोबर महिन्याचा प्रलंबित हप्ता कधी मिळणार, याची प्रतीक्षाही महिलांना लागून राहिली आहे. या हप्त्याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा होण्याची लाभार्थी महिलांना अपेक्षा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.