MPSC Exam Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra recruitment exam transparency Exam : परीक्षा, भरती प्रक्रियेच्या सुधारणांसाठी टास्क फोर्स; अडीचशे विद्यार्थ्यांकडून सूचनांचा पाऊस

Maharashtra recruitment exam transparency News : सोमवारी सकाळपासून विद्यार्थ्यांनी विविध गटात भेटी देत अनेक सूचना केल्या. टास्क फोर्स सदस्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सूचना गांभीर्याने ऐकून घेतल्या.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय भरती परीक्षा टास्क फोर्सने छत्रपती संभाजीनगर विभागातील 247 विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी परीक्षा वेळापत्रक, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका तपासणी, पदसंख्या, परीक्षा केंद्रे, निकाल, नियुक्ती, प्रतीक्षा यादी व तक्रार निवारण यासह विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी शेकडो सूचनांचा पाऊस पाडला.

टास्क फोर्सच्या अध्यक्ष तथा सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस समितीचे सदस्य तथा पोलीस महासंचालक सदानंद दाते, सदस्य सचिव तथा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी, सदस्य तथा नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम उपस्थित होते.

तर दूरदृश्य प्रणालीद्वारे समितीचे सदस्य तथा संघ लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य एअर मार्शल अजित शंकरराव भोसले आणि सदस्य तथा आयआयटी मुंबईचे प्राध्यापक श्यामप्रसाद करगड्डे सहभागी झाले होते. या संवाद कार्यक्रमात सातही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांतून विद्यार्थी ऑनलाइन सहभागी झाले होते.

सोमवारी सकाळपासून विद्यार्थ्यांनी विविध गटात भेटी देत अनेक सूचना केल्या. टास्क फोर्स सदस्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सूचना गांभीर्याने ऐकून घेतल्या. विद्यार्थ्यांनी परीक्षांचे वार्षिक वेळापत्रक निश्चित करून त्याचे पालन करावे, परीक्षा पद्धती व अभ्यासक्रमात वारंवार बदल करू नयेत आणि बदल आवश्यक असल्यास पुरेशी पूर्वसूचना द्यावी, अशी मागणी केली.

विविध संवर्गांतील रिक्त पदांची संख्या वेळेत जाहीर करून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, जलसंपदा, वैद्यकीय व दंत वैद्यकीय अधिकारी यांसह अन्य पदांची नियमित भरती करावी, अशी सूचनाही करण्यात आली. एकाच उमेदवाराची अनेक पदांवर निवड झाल्यास पदनिवड व पदाचा त्याग (ऑप्टिंग आऊट) याबाबत स्पष्ट धोरण असावे. त्यासोबतच रिक्त पदांवर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी द्यावी, अशी मागणी करण्यात या बैठकीत करण्यात आली.

पेपरफुटी रोखण्यासाठी तंत्रज्ञान वापरा..

प्रश्नपत्रिका निर्मितीपासून छपाई, वाहतूक व वितरणापर्यंतची प्रक्रिया अधिक सुरक्षित करावी, प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या व्यक्तीलाही परीक्षेचे स्वरूप व प्रश्नपत्रिकेची माहिती मिळणार नाही, अशी व्यवस्था विकसित करावी आणि प्रश्नपत्रिका फुटीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशी सूचना विद्यार्थ्यांनी केली. प्रश्नपत्रिकांतील चुका व भाषांतरातील त्रुटी टाळण्यासाठी विषयतज्ज्ञांची मदत घ्यावी.

राज्यसेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची ठेवावी, प्रश्नांची काठिण्याची पातळी विद्यापीठीय अभ्यासक्रमाशी सुसंगत असावी आणि गट-ब व गट-क परीक्षांतील भाषा विषय पात्रता स्वरूपाचे ठेवावेत, अशा सूचनाही मांडण्यात आल्या. उत्तरपत्रिका तपासणी व गुणांकनासाठी समान निकष निश्चित करून परीक्षकांची गुणवत्ता व पात्रता तपासावी, अशी सूचनाही काही विद्यार्थ्यांनी केली.

परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी पुराव्यासह लेखी सादर करा..

उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेची कार्बन प्रत, प्राथमिक व अंतिम उत्तरतालिका तसेच आदर्श उत्तरे उपलब्ध करून द्यावीत आणि आवश्यकतेनुसार फेरतपासणीची सुविधा द्यावी. कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२३ व राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मधील उत्तरपत्रिका तपासणी, गुणदान व गुणांतील फरकाबाबतही विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदविले. चुकीचे प्रश्न व परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी पुराव्यासह लेखी स्वरूपात सादर करण्याचे आवाहन व्ही. राधा यांनी केले.

ऑनलाइन परीक्षांबाबतही विद्यार्थ्यांनी विविध सूचना केल्या. संगणकाधारित परीक्षा घ्यायची असल्यास ती एकाच सत्रात घ्यावी, विविध सत्रांतील गुणांचे समायोजन टाळावे आणि सीसीटीव्ही चित्रीकरण व जैवमितीय पडताळणीसह प्रभावी नियंत्रण व्यवस्था करावी. सुरक्षित यंत्रणा उपलब्ध होईपर्यंत ऑफलाइन, ओएमआर पद्धतीने परीक्षा घेण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली.

पुढील एक वर्ष ऑनलाइन परीक्षा न घेता ओएमआर पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याचे व्ही. राधा यांनी स्पष्ट केले. ओएमआर परीक्षांसाठी प्रमाणित नियमावली तयार करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. परीक्षा केंद्र उमेदवारांनी अर्ज केलेल्या जिल्ह्यातच, शक्य असल्यास, द्यावे आणि केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली.

तांत्रिक पदांसाठी किमान एक वर्षाचा अनुभव, पशुधन पर्यवेक्षकांच्या ३२२ पदांची जाहिरात व अभ्यासक्रम तातडीने प्रसिद्ध करावा, तसेच मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक, औषध निरीक्षक व अन्य तांत्रिक पदांच्या प्रश्नपत्रिकांचा दर्जा सुधारावा. वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार अधिक संधी द्याव्यात. अभियांत्रिकी तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील पदांसाठीच्या पात्रता अटींचा पुनर्विचार करावा, अशी सूचनाही करण्यात आली.

कृषी सेवा गट - अ, गट - ब व गट - क पदांची एकत्रित जाहिरात तसेच गट - ब व गट - क संवर्गांसाठी सामायिक परीक्षा घ्यावी. शिक्षक भरतीच्या परीक्षेत बालमानसशास्त्राला प्राधान्य देण्यात यावे, विषयानुसार स्वतंत्र प्रश्नपत्रिका तयार करावी आणि उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेची प्रत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली. कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व विभागीय पोलीस उपनिरीक्षक पदांच्या परीक्षा नियमितपणे घ्याव्यात आणि संभाव्य रिक्त पदांची माहिती वेळेत जाहीर करावी, असेही यावेळी सांगण्यात आले.

पोलीस भरतीसाठी १ हजार ६०० मीटर धावण्याच्या चाचणीचा फेरविचार करा..

पोलीस भरतीतील १ हजार ६०० मीटर धावण्याच्या चाचणी पद्धतीचा पुनर्विचार करून मृत्यू झालेल्या उमेदवारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी.आरक्षण, प्रमाणपत्रे व विविध योजनांबाबतही सूचना करण्यात आल्या. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणातील अडचणी दूर कराव्यात, खेळाडू प्रवर्गातील प्रमाणपत्रांची काटेकोर पडताळणी करावी आणि सारथी, बार्टी, महाज्योती व टीआरटीआयच्या योजनांमध्ये पारदर्शकता वाढवावी.

सीईटीमार्फत अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना जात पडताळणी प्रमाणपत्राच्या विलंबामुळे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी प्रलंबित प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करावी, अशी सूचनाही करण्यात आली. प्राध्यापक भरतीतील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे व्ही. राधा यांनी सांगितले.

एमपीएससीचे मनुष्यबळ, तांत्रिक क्षमता व संस्थात्मक रचना बळकट करावी, अध्यक्ष व सदस्यांची रिक्त पदे तातडीने भरावीत आणि परीक्षा, निकाल व नियुक्तीची प्रक्रिया निश्चित वेळेत पूर्ण करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. तमिळनाडू व गुजरात लोकसेवा आयोग तसेच संघ लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतींचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी उपयुक्त सुधारणा करण्याचे काम सुरू असल्याचे व्ही. राधा यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सूचनांसोबत तज्ज्ञांची मते विचारात घेऊन परीक्षा प्रक्रियेची गुणवत्ता, सुरक्षितता व विश्वासार्हता वाढविण्यासाठी आवश्यक निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT