Ladki Bahin Yojana Sarkarnama
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण' योजनेतून महिलांना अर्थसहाय्याचा नवा मार्ग; पतसंस्थांना शासनाची मंजुरी

Ladki Bahin Yojana : सहकार विभागाच्या नव्या उपक्रमाअंतर्गत ही योजना राबविण्यात येणार असून महिलांना थेट पतसंस्थेचा कारभार हाताळण्याची संधी मिळणार आहे.

Rashmi Mane

राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. या योजनेच्या लाभार्थी महिलांना आता महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करता येणार आहे. सहकार विभागाच्या नव्या उपक्रमाअंतर्गत ही योजना राबविण्यात येणार असून महिलांना थेट पतसंस्थेचा कारभार हाताळण्याची संधी मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत महिलांना त्यांच्या कार्यक्षेत्रानुसार प्राथमिक सभासद संख्या आणि भांडवल ठरवण्यात आले आहे.

  • नगरपालिका क्षेत्रात – किमान 500 सभासद आणि 5 लाख रुपयांचे भांडवल

  • गाव कार्यक्षेत्र – 250 सभासद आणि 1.5 लाख रुपये भांडवल

  • तालुका स्तर – 500 सभासद आणि 5 लाख रुपये भांडवल

  • जिल्हास्तर – 1500 सभासद आणि 10 लाख रुपये भांडवल

या निकषांची पूर्तता करणाऱ्या महिला गटांना पतसंस्था नोंदणीची परवानगी मिळणार आहे. यासाठी 8 मार्च 2019 च्या शासन परिपत्रकातील मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहेत. महिला व बालविकास विभागाच्या सहाय्याने लाभार्थ्यांची यादी तयार केली जाणार असून ती योजनेसाठी प्रमाणित केली जाणार आहे.

जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी सांगितले की, “महिलांच्या हातात आर्थिक स्वायत्तता देण्यासाठी हा उपक्रम क्रांतिकारी ठरणार आहे. गाव ते जिल्हा स्तरावर महिलांना आता आपली स्वतःची पतसंस्था चालवता येणार आहे.”

महामंडळ आणि सहकार विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून हे नोंदणी अभियान राबविण्यात येणार असून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास चालना मिळणार आहे.

या उपक्रमामुळे राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्याची संधी मिळणार असून त्यातून ग्रामीण आणि शहरी भागातील महिला उद्योजकतेला मोठा बळकटीचा आधार मिळणार आहे.

SCROLL FOR NEXT