Shiv Sena Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

MLC Election : शिंदेंच्या लाडक्या नेत्याचा बहुचर्चित 'ठाणे पॅटर्न'; महापालिकेत पत्नी अन् आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत पतीनं उधळला 'बिनविरोध' विजयाचा गुलाल

Thane Palghar Election News : येत्या काळात 11 पैकी चार जागांवर बंडखोर उमेदवारांना आघाडी पुरस्कृत करीत मैदानात उतरावे लागणार आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील विधानपरिषद निवडणुकीत 17 पैकी सहा जागा बिनविरोध करीत महायुतीने आघाडी घेतली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होण्यापूर्वीच महाविकास आघाडीवर मोठी नामुष्की ओढवली आहे. येत्या काळात 11 पैकी चार जागांवर बंडखोर उमेदवारांना आघाडी पुरस्कृत करीत मैदानात उतरावे लागणार आहे. त्यातच महायुतीने मात्र या निवडणुकीत जोरदार कमबॅक केले आहे. ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शिलेदार रवींद्र फाटक याठिकाणी विजयी झाले आहेत. ठाण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत फाटक यांच्या पत्नी देखील बिनविरोध विजयी झाल्या होत्या. त्यामुळेच 'बिनविरोध' निवडीचा ठाणे पॅटर्न चांगलाच चर्चेत आला आहे.

विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत जोरदार लढत होईल असे चित्र होते. मात्र या निवडणुकीच्या मैदानातून वैयक्तिक कारणास्तव राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अभिजित पवार यांनी माघार घेतली. त्यामुळे या मतदार संघातील निवडणूक बिनविरोध झाली. याठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक बिनविरोध विजयी झाले. याठिकाणी उमेदवाराने अचानक माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीवर मोठी नामुष्की ओढवली आहे.

'बिनविरोध' निवडीचा असाही योगायोग

पाच महिन्यापूर्वी झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत रवींद्र फाटक यांच्या पत्नी जयश्री फाटक यांनी देखील बिनविरोध विजय संपादन केला होता. त्यानंतर आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे (Shivsena) उमेदवार रवींद्र फाटक बिनविरोध विजयी झाले. त्यामुळे पत्नीनंतर पती बिनविरोध निवडून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ठाणे मतदारसंघाचा इतिहास पहिला तर याआधी विधानपरिषदेचे माजी उपसभापती स्व. वसंत डावखरे यांना देखील 'मातोश्री'वरून पाठींबा देत त्यांचा बिनविरोध विजयी होण्याचा मार्ग सुकर करण्यात आला होता. त्यामुळे 'बिनविरोध' निवडीचा अनोखा योगायोग या निमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे.

ठाणे मतदारसंघ हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा गड मानला जातो. याठिकाणी खूप वर्षांपासून शिवसेनेचे एकहाती वर्चस्व आहे. त्यामुळे याठिकाणीच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा विजय निश्चित समजला जात होता. ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अभिजित पवार यांनी माघार घेतली. त्यामुळे याठिकाणी फाटक यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT