Mumbai News : राज्यातील रिक्त होत असलेल्या नऊ जागासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. या नऊ जागेसाठी व एका जागेच्या पोटनिवडणुक होत आहे. भाजपने सहा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दोन तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एक उमेदवार तर महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एकमेव अर्ज दाखल झाला असल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीतील एका जागेसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना व काँग्रेसमध्ये तिढा होता. मात्र, या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या निर्णयाला काँग्रेसने समर्थन देत उमेदवार न देण्याचा निर्णय घेत असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे सकाळपासूनच नाट्यमय घडामोडी घडल्याचे पाहवयास मिळाले. महाविकास आघाडीतील एका जागेसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त करीत उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला होता. दिल्ल्लीवरुन त्यांनी एबी फॉर्म आणला होता.
त्यानंतर शुक्रवारी सकाळीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. त्यामध्ये येत्या काळात होत असलेल्या राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकीबाबत चर्चा झाली. त्यानंतर हा तिढा सुटला.
त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ, ठाकरे यांच्या शिवसेनेचे अनिल देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या निर्णयाला काँग्रेसने समर्थन देत त्यांनी रिंगणात उतरवलेले उमेदवार अंबादास दानवे यांना पाठींबा देत असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
त्यामुळे आता विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात दहा जागेसाठी दहाच उमेदवार रिंगणात असणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार, प्रज्ञा सातव एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नीलम गोऱ्हे, बच्चू कडू तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने झिशान सिद्दकी यांना उमेदवारी दिली आहेत तर महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली आहे. दहा जागेसाठी दहा अर्ज दाखल झाला असल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांचे आता याबाबतच्या अधिकृत घोषणेकडे लक्ष लागले आहे.