Maharashtra MLC Election : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक घोषित केली आहे. मागील काही वर्षांपासून रिक्त असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी ही निवडणूक होणार आहे. यातील 16 जागा या नियमित आहेत तर नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.
या निवडणुकीसाठी 25 मे पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 1 जून अंतिम तारीख असून 2 जून रोजी अर्जांची छाननी होणार आहे. 4 जून अर्ज मागे घेण्यासाठीची मुदत आहे. तर 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान आणि 22 जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे.
महाराष्ट्रात 2020 पासून कोव्हिड आणि ओबीसी आरक्षण यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नव्हत्या. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून जाणाऱ्या विधानपरिषदेच्या 17 जागा टप्प्या-टप्प्याने रिक्त झाल्या आहेत. आता 20 जिल्हा परिषद वगळता राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत संबंधित मतदारसंघातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पंचायत समित्यांचे सभापती मतदान करतात. त्यामुळे इथले संख्याबळ निर्णायक भूमिका बजावते. 20 जिल्हा परिषदांची निवडणूक झाली नसली तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 मतदारसंघांमध्ये मतदारांची संख्या 75 टक्के वा त्यापेक्षा अधिक आहे.
त्यामुळे नियमानुसार तिथे निवडणूक होण्यात कोणतीही अडचण नाही. आज घडीला पुणे, सोलापूर, सातारा-सांगली आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या 4 जागांवर 100 टक्के मतदार आहेत. तर जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित असलेल्या 24 जिल्ह्यांत नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका इथल्या मतदारांची संख्या 75 टक्क्यांच्या वरती जाते.
रिक्त असलेले 17 स्वराज्य संस्था मतदारसंघ :
ऑगस्ट 2025 : छत्रपती संभाजीनगर-जालना, नोव्हेंबर 2024 : नागपूर, जून 2024 : बीड-उस्मानाबाद-लातूर, परभणी-हिंगोली, नाशिक, अमरावती, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, डिसेंबर 2022 : पुणे, ठाणे-पालघर, सांगली-सातारा, जळगाव, नांदेड, यवतमाळ, भंडारा-गोंदिया. जानेवारी 2022 : सोलापूर, अहमदनगर (अहिल्यानगर).
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.