Political focus shifts to NCP leadership as Sunetra Pawar prepares to take a key decision on the party’s lone MLC seat in Maharashtra. sarkarnama
महाराष्ट्र

MLC Election : विधानपरिषद निवडणूक : राष्ट्रवादीकडून 7 नावं शॉर्टलिस्ट; सुनेत्रा पवार घेणार उमेदवारीचा 'अंतिम' निर्णय

MLC Election : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या एकमेव जागेसाठी सुनेत्रा पवार यांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

Hrishikesh Nalagune

MLC Election : विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक घोषित झाली आहे. 13 मे रोजी विधान परिषदेसाठी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. विधानसभेतील सध्याचे पक्षीय बलाबल पाहता सत्ताधारी महायुतीचे पारडे जड दिसत आहे. या 9 जागांपैकी तब्बल 8 जागा महायुती सहज जिंकेल असे चित्र आहे. यामध्ये भाजप 5, शिवसेना 2, आणि राष्ट्रवादी काँग्रेस 1 जागा जिंकू शकते.

विधानपरिषदेच्या या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या एकमेव जागेवर उमेदवाराची निवड करणे ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पहिली राजकीय कसोटी ठरणार आहे. खासदार पार्थ पवार यांची या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका असून, उमेदवार निवडीत पवार कुटुंबाशी निष्ठा हा निकष असण्याची शक्यता आहे.

पक्षातील निर्णय प्रक्रियेवर पवार कुटुंबाचे वर्चस्व असल्याचे दाखविण्याची पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. त्यासाठी निष्ठावंतांना प्राधान्य दिल्यास तसा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोचवण्याची संधी सुनेत्रा पवार यांना मिळणार आहे. पक्षाध्यक्ष झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा हा पहिलाच मोठा राजकीय निर्णय असेल, असे पक्षातील एका मंत्र्याने सांगितले.

अनेक जण इच्छुक :

सुनील तटकरे यांच्याकडून पुत्र अनिकेत तटकरे, तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडून निकटवर्तीय माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उमेदवारीची शिफारस करण्यात आल्याची माहिती आहे. शिवाय दिवंगत बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि माजी आमदार झिशान सिद्दीकी, प्रवक्ते आनंद परांजपे आणि उमेश पाटील यांचीही नावं चर्चेत आहेत.

दिवंगत अजित पवार यांचे एकनिष्ठ शिलेदार अमोल मिटकरी हेही पुन्हा उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्नात आहेत. 2020 मध्ये अजित पवार यांनी अमोल मिटकरी यांना शब्द दिल्याप्रमाणे विधानपरिषदेची उमेदवारी दिली होती. आता मे महिन्यात ते निवृत्त होत आहेत. मात्र प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा मिटकरी यांच्या उमेदवारीला विरोध असल्याची चर्चा आहे.

यासोबतच पुण्यातील उद्योगपती आणि माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांच्याही नावाची उमेदवारीसाठी चर्चा सुरु आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी खासदार पार्थ पवार यांची भेट घेतल्याची माहिती आहे. संजय काकडे 2014 मध्ये राज्यसभेवर निवडून गेले होते. युती, मनसे आणि अपक्षांची मोट बांधून काकडे यांनी विजय मिळवला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT