Maharashtra Police Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Police : ‘खाकी स्वॅग’च्या ट्रेंडविरोधात पोलिस दलाचा कठोर निर्णय, ‘रील्स’ आणि व्हिडिओंवर तात्काळ बंदी

Maharashtra Police circular to ban on reels and mini vlogs : राज्यातील पोलिस दलाने मोठा निर्णय घेतला असून पोलिसंकडून गणवेशात सोशल मीडियावर टाकल्या जाणाऱ्या ‘रील्स’ आणि ‘मिनी-व्लॉग’वर निर्बंध घालण्यात आले आहेत.

Aslam Shanedivan

  1. महाराष्ट्र विधानसभेमध्ये ‘खाकी स्वॅग’ व्हिडिओ ट्रेंडबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर कडक भूमिका घेण्यात आली.

  2. शासनाने जुलै 2025 मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

  3. पोलिस दलातील 51 हजार कर्मचाऱ्यांवर हा आदेश लागू असून मुंबई पोलीस सोशल मीडिया लॅबला देखरेखीची जबाबदारी देण्यात आली आहे.

Mumbai News : मुंबई पोलिस दलाने रील्स, मिनी-व्लॉग्स किंवा इतर कोणत्याही प्रकारचे सोशल मीडिया व्हिडीओवर एक महत्त्वाचा आणि कडक निर्णय घेतला आहे. याबाबत पोलिस दलाने सुमारे 51 हजार पोलिस कर्मचाऱ्यांना आदेश काढत वर्दीत (युनिफॉर्ममध्ये) असताना असे रील्स, मिनी-व्लॉग्स किंवा पोस्ट व्हिडीओ पोस्ट करण्यास तात्काळ बंदी घातली आहे. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असाही स्पष्ट इशारा विशेष शाखेचे उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांनी जारी केलेल्या परिपत्रकातून देण्यात आला आहे.

विशेष शाखेचे डीसीपी कांबळे यांनी जारी केलेल्या परिपत्रकात, सोशल मीडियावर पोलिसांच्या वर्दीतल्या व्हिडीओंचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अनेकदा ‘खाकी स्वॅग’ दाखवत पोलिस कर्मचारी डान्स, फिटनेस, ड्यूटी दरम्यानचे क्षण किंवा मजेशीर कंटेंट पोस्ट करतात. ज्यामुळे गोपनीयता आणि ऑपरेशनल सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यानेच हे पाऊल उचलण्यात आल्याचे डीसीपी कांबळे यांनी म्हटलं आहे.

तसेच या परिपत्रकात, मुंबई पोलिस दलातील काही अधिकारी/कर्मचारी वर्दीत असताना सोशल मीडियावर रील्स, मिनी-व्लॉग्स किंवा इतर व्हिडीओ तयार करून पोस्ट करत असल्याचे लक्षात आल्याचे नमुद करण्यात आले आहे. तर यापुढे असे कोणतेही व्हिडीओ अपलोड करू नयेत, निर्देश देताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असेही बजावण्यात आले आहे.

या प्रकारांना आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांची सोशल मीडिया लॅब कार्यरत करण्यात आली आहे. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून नियमभंगाच्या घटना नोंदवणे आणि वरिष्ठांना अहवाल सादर करणे, असे आदेश लॅबच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे ही लॅब ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सक्रियपणे नजर ठेवणार असून आदेशाचे उल्लंघन होताच याची नोंद केली जाणार आहे. या प्रमाणे संबंधितावर कारवाई केली जाणार आहे. डीसीपी कांबळे यांनी हा निर्णय २० फेब्रुवारी २०२६ रोजी जारी केला असून तो तात्काळ लागू झाला आहे.

दरम्यान आता मुंबई पोलिस दलाने सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. मात्र आता वर्दीतील व्हिडीओंवर थेट बंदी घालण्यात आली असून पोलिस दलाने ‘खाकी स्वॅग’च्या ट्रेंडविरोधात कठोर निर्णय घेतला आहे. पण हा निर्णय कर्मचाऱ्यांना वैयक्तिक सोशल मीडिया वापरावर बंधन घालणार नसून ते वर्दीशिवाय कंटेंट तयार करू शकतात असेच सांगणार आहे. मात्र, गोपनीयता आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर आता अधिक सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

विधानसभेतही गाजला मुद्दा

सोशल मीडियावर ‘खाकी स्वॅग’ दाखवणाऱ्या पोलिसांच्या व्हिडिओंचा ट्रेंडचा मुद्दा महाराष्ट्र विधानसभेत लक्षवेधीत काही आमदारांनी मांडला होता. यावेळी हा मुद्दा चांगलाच गाजला होता. दरम्यान, राज्य सरकारने जुलै 2025 मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक आणि अधिकृत सोशल मीडिया खाती वेगळी ठेवावीत, शासकीय पदनाम, लोगो, कार्यालयाचा पत्ता किंवा शासकीय मालमत्ता वैयक्तिक खात्यावर वापरू नये, कोणतीही गोपनीय माहिती पूर्वपरवानगीशिवाय प्रसारित करू नये, असे निर्देश देण्यात आले होते.

FAQs :

1. ‘खाकी स्वॅग’ व्हिडिओ प्रकरण काय आहे?
गणवेशातील पोलिसांनी सोशल मीडियावर रील्स आणि स्टाइलिश व्हिडिओ पोस्ट केल्याने हा ट्रेंड चर्चेत आला.

2. सरकारने कोणत्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत?
वैयक्तिक आणि अधिकृत खाती वेगळी ठेवणे, शासकीय पदनाम किंवा लोगो वैयक्तिक खात्यावर वापरू नये आणि गोपनीय माहिती प्रसारित करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

3. हा आदेश किती पोलिस कर्मचाऱ्यांना लागू आहे?
राज्यातील सुमारे 51 हजार पोलिस कर्मचाऱ्यांना हा आदेश लागू आहे.

4. नियमभंगावर कोण कारवाई करणार?
मुंबई पोलीस सोशल मीडिया लॅब विविध प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून नियमभंगाच्या घटना नोंदवेल आणि वरिष्ठांना अहवाल देईल.

5. आदेशाचे उल्लंघन केल्यास काय होईल?
उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT