Mahayuti Sarkarnama
महाराष्ट्र

Mahayuti : बेताल नेत्यांच्या बडबडीने महायुतीची हिट विकेट? हे त्रिकूट नेमकं काय बडबडलंय?

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना विरोधकांना ठोकून काढा, असे विधान काही दिवसांपूर्वीच पुण्यात केले होते. हवी तशी बॅटिंग करा, फक्त हिट विकेट होऊ नका, असंही ते म्हणाले होते. फडणवीसांची ही भीती खरी ठरताना दिसत असून बेताल नेत्यांमुळे महायुतीची हिट विकेट पडल्याचे सध्याचे चित्र आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाट तर भाजपचे खासदार अनिल बोडेंनी केलेली विधाने वादग्रस्त ठरली आहेत. त्यावर विरोधकांकडूनही आसूड ओढले जात आहेत. गायकवाड आणि बोंडे यांच्याविरोधात गुरूवारी काँग्रेसकडून राज्यभर आंदोलन केले जात आहे.

राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्यास बक्षीस

संजय गायकवाड हे नेहमीच वादात अडकतात. त्यांच्या भडक वक्तव्यांनी अनेकदा अडचणीत आले आहेत. नुकतेच त्यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटण्याची भाषा केली. जीभ छाटणाऱ्यास 11 लाखांचे बक्षीस देऊ, अशी घोषणा त्यांनी केली होती. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोन दिवसांपूर्वी लिहिलेल्या पत्रातही याचा उल्लेख आहे. गायकवाड आजही आपल्या विधानावर ठाम आहेत.

बोंडेंची चटके देण्याची भाषा

फडणवीसांनी बजावल्यानंतरही भाजपचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडेंनी राहुल गांधींविषयी वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढवून घेतला आहे. गायकवाड यांचे विधानावर त्यांनी आक्षेप घेतला खरा पण राहुल गांधींच्या जीभेला चटके द्या, असे म्हणत त्यांनी पुन्हा आगीत तेल ओतले. मागे हटतील ते बोंडे कसले. काँग्रेसच्या आंदोलनानंतरही त्यांनी विधानावरून माघार घेतलेली नाही.

शिरसाटांची निष्ठा अन् विष्टा

ठाकरे गटाच्या नेत्यांवर टीका करताना संजय शिरसाट यांनी निष्ठा हा शब्द तुमच्यासाठी विष्ठेसारखा झाला आहे, अशी टीका केली होती. शिरसाट यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या या विधानामुळे वाद निर्माण झाला होता. त्याला ठाकरे गटाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले.

दरम्यान, गायकवाड, बोंडे आणि शिरसाट हे केवळ तीनच नेते नाहीत, तर महायुतीतील इतर काही नेत्यांची विधानेही पातळी सोडून केलेली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी हिट विकेट होऊ नका, असे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले होते. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारही बेताल वक्तव्य करणाऱ्यांना नेत्यांना सातत्याने खडेबोल सुनावत आहेत. पण त्यानंतरही नेत्यांची बेताल बडबड सुरूच आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT