Operation Tiger News: राज्याचे राजकारण सध्या 'ऑपरेशन टायगर' च्या चर्चांनी ढवळून निघाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नऊ पैकी सात खासदार फुटणार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काल ( दि. १४ जून) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्या खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली होती. या बैठकीला नऊ पैकी चार खासदार प्रत्यक्ष तर बाकीचे ऑनलाईन उपस्थित होते. यवतमाळ-वाशिम लोकसभेचे खासदार संजय देशमुख काल उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या बैठकीला ॲानलाईन पद्धतीनं उपस्थित होते. कालच्या या हायव्होल्टेज बैठकीनंतर आज ठाकरेंचे संजय देशमुख यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली आहे.
काय आहे 'ऑपरेशन टायगर'?
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सात खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु आहेत. काही दिवसांपुर्वी एका कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मोठा दावा केला होता. प्रतापराव जाधव म्हणाले होते, 'ऑपरेशन टायगर आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून ते पूर्णत्वाकडे गेले आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेणार आहेत. ज्या दिवशी योग्य वेळ आणि मुहूर्त ठरवतील, त्या दिवशी हे ऑपरेशन पूर्ण होईल.' त्यातच आता खासदार संजय देशमुख यांनी प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
ठाकरेंच्या नेत्याने दिला होता दुजोरा
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि आमदार अंबादास दानवे यांनी काही पत्रकारांना उत्तर देताना "काही जण संपर्कात आहेत, तर काही उघड उघड बोलतात. आम्हाला सर्व माहीत आहे. लोकसभा निवडणुकीपासून महिना-दोन महिन्याला संपर्कात असल्याची चर्चा होते. आता हे अधिकृत मान्य करायला हवे.'' असे सांगितले होते. दानवेंच्या याच उत्तराला अनुसरून प्रतापराव जाधवांनी एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतल्यावर 'ऑपरेशन टायगर' सुरू असल्याच्या चर्चांना दुजोरा दिला होता.
कोणते 'सात' खासदार फुटणार?
या सात खासदारांमध्ये प्रमुख नाव आहे, परभणीचे खासदार संजय जाधव यांच. यानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, मुंबई उत्तर पूर्वचे खासदार संजय दिना पाटील, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची नावे देखील चर्चेत आहेत.
संजय देशमुख यांचे स्पष्टीकरण
उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याच्या चर्चा सुरू असतानाच, खासदार संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरेंना फोनद्वारे या भेटीबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. मतदारसंघातील एका कॉलेजच्या परवानगी संदर्भात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. आपण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.