Parbhani News : राज्यातील राजकारण गेल्या काही दिवसापासून 'ऑपरेशन टायगर'बाबत होत असलेल्या चर्चेमुळे चांगलेच तापले आहे. 'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर दररोज नवनवीन वक्तव्ये केली जात आहेत. दिल्लीत एनडीएची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीस गेलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या काही खासदारांनी भेट घेतली असल्याची चर्चा रंगल्याने 'ऑपरेशन टायगर'वरून वेगवेगळी वक्तव्ये होत आहेत.
त्यातच अंबादास दानवे यांनी 'काही लोक संपर्कात आहेत, तर काही उघड उघड बोलतात,' असे विधान केले होते. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी रविवारी (14 जूनला) मातोश्रीवर खासदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते व केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांनी 'ऑपरेशन टायगर'बाबत मोठे विधान केले आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे काही खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा वारंवार पाहायला मिळत आहे. त्यातच गंगाखेड तालुक्यातील सुनेगाव येथे एका हर्बल फार्मा कंपनीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी मोठा दावा केला आहे. माजी विरोधी पक्षनेते व ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी त्याची अप्रत्यक्षपणे कबुली दिली आहे. त्यामुळे आता आम्हाला यावर अधिक काही बोलण्याची आवश्यकता राहिलेली नसल्याचे प्रतापराव जाधव यांनी स्पष्ट केले.
प्रतापराव जाधव म्हणाले, 'ऑपरेशन टायगर आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून ते पूर्णत्वाकडे गेले आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेणार आहेत. ज्या दिवशी योग्य वेळ आणि मुहूर्त ठरवतील, त्या दिवशी हे ऑपरेशन पूर्ण होईल.' या ऑपरेशन टायगरबाबत स्वतः उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे काही नेतेच कबुली देत असल्याचे सांगत येत्या काळात पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
अंबादास दानवे नेमके काय म्हणाले?
'ऑपरेशन टायगर'बाबत अंबादास दानवे यांच्याकडे काही पत्रकारांनी विचारणा केली असता ते म्हणाले, "काही जण संपर्कात आहेत, तर काही उघड उघड बोलतात. आम्हाला सर्व माहीत आहे. लोकसभा निवडणुकीपासून महिना-दोन महिन्याला संपर्कात असल्याची चर्चा होते. आता हे अधिकृत मान्य करायला हवे.' दानवे यांच्या याच विधानाचा संदर्भ देत प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आता घेरले आहे.
दरम्यान, शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची वाट धरली आहे. त्यातच गेल्या काही दिवसापासून ठाकरे सेनेचे निवडून आलेल्या 9 पैकी 7 खासदार शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरात रंगली आहे. राज्यात लवकरच ऑपरेशन टायगर राबविले जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी रविवारी (14 जूनला) मातोश्रीवर ही बैठक बोलावली आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.