Marathwada Politics : महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवण्यात येणाऱ्या 7 पैकी भाजपाच्या कोट्यातील 4 जागांचा सस्पेंस बुधवारी (4 मार्च) संपला. दिल्लीतील भाजप नेत्यांनी अपेक्षेप्रमाणे रामदास आठवले आणि विनोद तावडे यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले. इतर 2 नावे मात्र पक्षाच्या धक्कातंत्राला अनुसरूनच समोर आली. नागपूरमधून भाजपाच्या महापालिकेतील पहिल्यांदाच नगरसेविका झालेल्या आदिवासी समाजाच्या माया इवनाते आणि परभणी जिल्ह्यातील धनगर समाजाचे नेते, माजी आमदार रामराव वडकुते यांच्या उमेदवारीने सर्वांनाच धक्का बसला.
या उमेदवारांच्या घोषणेनंतर चर्चेतील अनेक नावांचा पत्ता कट झाला आहे. यातीलच एक नाव म्हणजे अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा. राज्यसभेची उमदेवारी देऊन राणा यांचे पुनर्वसन होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, माया इवनाते यांना उमेदवारी देत भाजपने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. आता राणा यांना उमेदवारी न मिळण्यामागे नेमके कोणकोणते घटक कारणीभूत ठरले याबाबतच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपला दगा देणं भोवलं?
मनपा निवडणुकीत रवी राणा यांनी भाजप विरोधात युवा स्वाभिमानचे उमेदवार उभे केले होते. त्या उमेदवारांच्या समर्थनार्थ नवनीत राणा यांनी खुली भूमिका घेतली होती. युवा स्वाभिमानमुळे भाजपचे डझनभर उमेदवार पराभूत झाले होते. त्यामुळे राणांबद्दल भाजपमध्ये प्रचंड असंतोष होता. भाजपच्या अमरावतीतील नेत्यांनी राज्यातील वरिष्ठ नेत्यांकडे राणा यांची जाहीर तक्रार केली होती. त्यांच्या हकालपट्टीचीही मागणी केली होती.
स्थानिक नेतृत्वाशी वाद :
नवनीत राणा आणि भाजपची जुनी फळी यांचे मागच्या 6 वर्षांपासूनच खटके उडत आहेत. प्रवीण पोटे पाटील यांच्यासह अन्य नेत्यांचे राणा यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात वाद झाले होते. जाहीर सभेत रवी राणा यांनी पाटील यांच्याबाबत अर्वाच्य भाषा वापरली होती. तिथूनच वादाला सुरुवात झाली होती. राणा यांची सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याची भावना नाही, असे पाटील यांचे मत होते. त्यानंतर नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यास अमरावतीतील खुद्द भाजप नेत्यांनीच विरोध केला.
केवळ भाजपमधूनच नाही तर मित्रपक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार जनशक्ती पक्षाचाही राणा यांच्या उमेदवारीला विरोध होता. स्थानिक पातळीवरून प्रचंड विरोध असतानाही भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. त्यामुळे सगळे मित्रपक्ष भाजपपासून दूर गेले. याचा परिणाम म्हणूनच राणा यांचा लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला. त्यानंतरही राणा यांना पक्षातून काढून टाकावे अशी मागणी झाली होती.
अनिल बोंडे राज्यसभेवर :
अमरावती जिल्ह्यातून सध्या अनिल बोंडे हे राज्यसभेचे खासदार आहेत. अशात पराभूत नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यास एकाच जिल्ह्यातून राज्यसभेचे दोन उमेदवार दिले गेले असते. त्यामुळे अन्य राज्यातील जिल्ह्यात नाराजी पसरली असती. शिवाय महापालिकेत भाजपचे उमेदवार पाडल्यानंतरही राणा यांना ताकद दिली असती तर स्थानिक पातळीवर आणखी धुसफूस वाढली असती. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठीच भाजपकडून राणा यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.