Mumbai News : आगामी काळात होत असलेली राज्यसभेची निवडणूक चुरशीची होणार आहे. राज्यातील सात जागेसाठी होत असलेली ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच महाविकास आघाडीतील घटक पक्षात एका जागेसाठी एकमत होत नसल्याने जोरदार रस्सीखेच दिसत आहे. त्यामुळे सात जागेसाठी आठ उमेदवार रिंगणात उतरले तर 2022 ची पुनरावृत्ती होणार का? याची उत्सुकता लागली आहे. त्यामुळे आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यातच महायुतीच्या वाट्याला येत असलेल्या असलेल्या सहा जागापैकी भाजपच्या चार जागा असून एक जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तर एक जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेसाठी पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेत चार माजी खासदारामध्ये जोरदार रस्सीखेच सुरु असतानाच त्यापैकी एकाचे नाव फायनल होण्याची शक्यता आहे.
राज्यसभेच्या सात जागेसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे. त्यासाठी जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. भाजपच्या (BJP) वाट्याला येत असलेल्या चार जागेपैकी एक जागा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासाठी सोडली जाणार आहे. तर उर्वरित तीन जागासाठी २५ जण इच्छुक आहेत. या इच्छुकांची नावे भाजपच्या केंद्रीय समितीकडे पाठवण्यात आली आहेत. भाजपच्या यादीत राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, माजी अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, खासदार धैर्यशील पाटील, माजी मंत्री रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडे, भारती पवार यांचीही नावे चर्चेत आहेत.
विधानसभेतील संख्याबळ पाहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेसाठी पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता 3 मार्चनंतर पार्थ पवार हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. एका उमेदवारासाठी 37 मतांचा कोटा असून राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार असल्याने त्यांचा एक उमेदवार निवडून येऊन तीन मते शिल्लक राहणार आहेत.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या वाट्याला एक जागा आली आहे. या एका जागेसाठी जोरदार रस्सीखेच दिसत आहे. या एकमेव जागेसाठी माजी खासदार राहुल शेवाळे यांचे नाव आघाडीवर आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारात शेवाळे यांची मोठी मदत झाली होती. त्यामुळेच शेवाळे यांना मुंबईतील विजयाची बक्षिसी म्हणून राज्यसभेची लॉटरी लागू शकते. दुसरीकडे या पदासाठी माजी खासदार गजानन कीर्तिकर, माजी खासदार संजय निरुपम, आनंदराव अडसूळ हे इच्छुक आहेत. या चार जणांत सध्या जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण-मध्य मुंबईतून राहुल शेवाळे यांचा निसटता पराभव झाला होता. शिवसेनेतील फुटीनंतर ते शिंदेंसोबत ठाम उभे राहिले, त्यामुळे त्यांचे राजकीय पुनर्वसन करणे शिंदे यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्याशिवाय शेवाळे यांनी अनेक वर्षे महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले होते. त्याचा फायदा शिवसेनेला नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत उमेदवार ठरवताना व प्रचार यंत्रणा राबवत असताना झाला. यापूर्वी ते दोन वेळा लोकसभेचे खासदार होते, त्यामुळे त्यांना संसदेच्या कामकाजाचा आणि दिल्लीतील राजकारणाचा दांडगा अनुभव आहे.
संसदेत पक्षाची बाजू मांडण्यासाठी शिंदे यांना एका अनुभवी नेत्याची गरज असून ते भरून काढतील, अशी अपेक्षा आहे. 2022 साली शिवसेनेत बंड झाले तेव्हा राहुल शेवाळे यांनी खासदारांचा गट शिंदेंसोबत नेण्यात मोठी भूमिका बजावली होती. त्यांच्या या निष्ठेचे फळ म्हणून त्यांना ही उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शिंदे सेनेकडून शेवाळे यांचे नाव जवळपास फायनल समजले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.