

Mumbai News : महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून खाली खेचून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत राज्यात सत्तास्थापन केली होती. त्यावेळी भाजपच्या सर्वाधिक जागा असूनही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद देण्यात आले होते. यानंतर अडीच वर्षे त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा काळ गाजवला. यानंतर महायुती सरकारच्या दुसर्या टर्ममध्येही ते मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही होते. पण भाजपनं त्यांची मागणी स्पष्टपणे धुडकावून लावली. यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागले. आता याचदरम्यान, शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यानं मोठं विधान केलं आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे त्यांच्या आक्रमक आणि रोखठोक भूमिकेसाठी ओळखले जातात. नुकताच त्यांनी मोठा दावा केला आहे. संजय राऊत यांनी मंगळवारी (ता.24) एकनाथ शिंदे हे पुन्हा कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नसल्याचं विधान केलं आहे. या त्यांच्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे हे पुन्हा कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. कारण भाजपा तसे होऊ देणार नाही. त्यांना भाजपामध्ये जावे लागेल, तिथे काही वेळ काढावा लागेल, तेव्हा कदाचित ते मुख्यमंत्री होऊ शकतात, त्याशिवाय नाही असं स्पष्ट मत राऊतांनी व्यक्त केलं आहे.
एकनाथ शिंदे किंवा त्यांच्यासोबतचे सर्व आमदार,खासदार हे आमचे सर्व सहकारी होते. त्यांनी आमच्यासोबत आणि आम्ही त्यांच्यासोबत वर्षानुवर्ष काम केल्याचं राऊतांनी म्हटलं. तेव्हा त्यांना शिवसेना फोडायची होती, म्हणून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याचा दावा राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले, जीव नकोसा होईल आणि तो इतका नकोसा करायचा की, तो आपला पक्ष सोडून तुमच्या पक्षात जाईल, इथंपर्यंत जीव नकोसा करायचा. हे अजित पवारांच्या बाबतीत झाले आहे आणि हे आम्ही डोळ्यांनी बघितले. अजित पवार, हसन मुश्रीफ, नवाब मलिक हे काय मनापासून भारतीय जनता पक्षाचा जवळ गेले नाहीत. हे आपली कातडी वाचायला आणि संपत्ती वाचवण्याकरिता गेले, असा हल्लाबोलही खासदार राऊतांनी यावेळी केला आहे.
पुण्यातील काँग्रेसचे प्रवक्ते हणमंत पवार मारहाण प्रकरणावरही संजय राऊत यांनी कठोर शब्दांत भाष्य केलं. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना थोडंजरी लोकशाहीचं काही असेल तर त्यांनी या विषयात लक्ष घातलं पाहिजे. विचारांची लढाई आपण विचारांनी करायचे बोलतो, त्यावेळी समोरच्या व्यक्तीकडेही विचार असावा लागतो ना..भाजपाकडे कोणता विचारच नाही. हिंदू मुसलमान यापेक्षा कोणता विचार आहे का त्यांच्याकडे? राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक असा कोणताही विचार त्यांच्याकडे नाही, असंही राऊतांनी म्हटलं.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाला मूर्ख म्हटले… का मूर्ख म्हटले… ते सुप्रीम कोर्टालाही माहिती आहे, इतकेच मी सांगेन. आमची मते मांडण्याचा पूर्ण अधिकार लोकशाहीमध्ये आम्हाला दिला असल्याचंही राऊत यांनी ठणकावून सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.