Teacher Recruitment Maharashtra Semi English Schools Sarkarnama
महाराष्ट्र

Teacher Recruitment: शिक्षक भरतीत मोठा बदल! सेमी इंग्रजी शाळांसाठी नियम शिथिल; हजारो उमेदवारांना दिलासा

Teacher Recruitment Maharashtra Semi English Schools:पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या शिक्षक भरतीत राज्य सरकारचा मोठा निर्णय. सेमी इंग्रजी शाळांसाठी पात्रतेचे नियम शिथिल; जाणून घ्या नवीन अटी.

Mangesh Mahale

Mumbai News : राज्यातील पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीत राज्य सरकारने महत्त्वाचा बदल केला आहे. शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी (२४ जुलै २०२६) प्रसिद्ध केलेल्या शासन शुद्धीपत्रकानुसार, सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील शिक्षक भरतीसाठी पात्रतेच्या अटींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक अर्हता पूर्ण न केलेल्या, मात्र इतर आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनाही संधी उपलब्ध होणार आहे.

मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (RTE) कायदा २००९ आणि त्याअंतर्गत शिक्षक पात्रता परीक्षेबाबतचे विद्यमान नियम कायम राहतील. मात्र, सेमी इंग्रजी अध्यापन पद्धती असलेल्या शाळांमध्ये शिक्षक उपलब्धतेचा प्रश्न लक्षात घेऊन भरती प्रक्रियेत आवश्यक बदल करण्यात आले आहेत, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

कोणते बदल करण्यात आले?

शासनाच्या नव्या निर्णयानुसार, इयत्ता १ ली ते ५ वी, ६ वी ते ८ वी तसेच १ ली ते १० वी या गटांतील सेमी इंग्रजी वर्गांसाठी शिक्षकांची नियुक्ती करताना उमेदवाराने शालेय शिक्षण मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड किंवा अन्य माध्यमातून पूर्ण केले असले, तरी त्याने इंग्रजी विषयाचा अभ्यास करून परीक्षा उत्तीर्ण केली असल्यास त्याच्या अर्जाचा विचार केला जाणार आहे.

इंग्रजी माध्यमातील व्यावसायिक अर्हता अनिवार्य नाही

यापूर्वी सेमी इंग्रजी विषय शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केलेली असणे आवश्यक होते. मात्र, अशा पात्र उमेदवारांचा अभाव असल्याने अनेक पदे रिक्त राहत होती. ही अडचण दूर करण्यासाठी शासनाने नियम शिथिल केले आहेत.

नवीन तरतुदीनुसार, संबंधित उमेदवाराकडे १२ वी विज्ञान शाखा किंवा बी.ए./एम.ए. (इंग्रजी) अथवा बी.एस्सी./एम.एस्सी. अशी पात्रता असल्यास, जरी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केलेली नसली तरी त्याला शिक्षक भरतीसाठी पात्र मानण्याची मुभा देण्यात आली आहे.

रिक्त पदे भरण्यास मदत

राज्यातील अनेक सेमी इंग्रजी शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता भासत असल्याने विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत होता. सरकारच्या या निर्णयामुळे रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा होणार असून, पात्र उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच पवित्र पोर्टलमार्फत होणारी शिक्षक भरती अधिक सुलभ आणि वेगवान होण्यासही मदत होणार आहे.

शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव शरद श्रीपतराव माकणे यांच्या स्वाक्षरीने हे शुद्धीपत्रक जारी करण्यात आले असून, हा आदेश तत्काळ लागू करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT