

Pune News: देशभरात NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र झाले असतानाच महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणारा आणखी एक मोठा घोटाळा समोर आला आहे. हा घोटाळा NEET पेपरफुटीशी संबंधित नसला, तरी शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि प्रशासकीय त्रुटी पुन्हा एकदा अधोरेखित करणारा ठरत आहे.
विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीत बनावट शालार्थ आयडी', खोट्या वैयक्तिक मान्यता आणि बेकायदेशीर वेतन वितरणाच्या माध्यमातून शासनाची १६० कोटी रुपयांहून अधिक फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात जळगाव जिल्हा परिषदेचे तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत भाऊराव हिंगोणेकर (वय ६६) यांना धुळे येथून अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना २७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
SIT च्या तपासानुसार, २०२२ ते २०२५ या कालावधीत शशिकांत हिंगोणेकर जळगाव येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोणतीही वैध प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण न करता वैयक्तिक मान्यता देण्यात आली.
नियमांनुसार शिक्षक अथवा कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शालार्थ प्रणालीमध्ये नोंद करण्यापूर्वी संबंधित नियुक्ती, मंजुरी आणि वैयक्तिक मान्यता आवश्यक असते. मात्र या प्रकरणात अधिकृत प्रस्तावच नसताना थेट मंजुरी देण्यात आल्याचा आरोप आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, एकूण २५९ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोणताही अधिकृत प्रस्ताव नसताना वैयक्तिक मान्यता देण्यात आली. त्यानंतर या कर्मचाऱ्यांची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये नोंदवून शासनाकडून नियमित वेतन तसेच थकबाकीची रक्कम काढण्यात आली.यामुळे शासनाच्या तिजोरीवर कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
या गैरव्यवहाराची व्याप्ती केवळ जळगावपुरती मर्यादित नसून नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांपर्यंत पोहोचल्याचे तपासात उघड झाले आहे. या चारही जिल्ह्यांमध्ये ८४२ शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या मागील तारखांच्या दाखवून कागदपत्रे तयार करण्यात आली. प्रत्यक्षात संबंधित नियुक्त्यांचे वैध प्रस्ताव उपलब्ध नसतानाही त्यांना शासकीय वेतनासाठी पात्र ठरविण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेमुळे शासनाची १६० कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक फसवणूकझाल्याचा प्राथमिक निष्कर्ष SIT ने नोंदवला आहे.
या महाघोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.. आतापर्यंतच्या तपासात सुमारे १२०० जणांचा सहभाग समोर आला आहे.
यामध्ये संस्थाचालक, मुख्याध्यापक, तत्कालीन शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षक तसेच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.
या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक व्यवहार, दस्तऐवज आणि शासकीय मंजुरींची सखोल पडताळणी सुरू आहे.
SIT आता बनावट मंजुरी देण्यामागील संपूर्ण साखळी शोधत आहे. बनावट कागदपत्रे कोणी तयार केली, मंजुरी कोणाच्या स्तरावर मिळाली, शालार्थ प्रणालीमध्ये नोंदी कशा करण्यात आल्या आणि आर्थिक लाभ नेमका कोणाला झाला याचा तपास सुरू आहे.
याशिवाय बँक व्यवहार, वेतन वितरणाची नोंद, नियुक्ती आदेश आणि प्रशासकीय फाईलींची छाननी करण्यात येत आहे. तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे आणखी काही वरिष्ठ अधिकारी आणि संस्थाचालकांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हा घोटाळा केवळ आर्थिक गैरव्यवहारापुरता मर्यादित नाही. शिक्षण क्षेत्रातील भरती प्रक्रिया, शिक्षक नियुक्ती, शासकीय अनुदान आणि शालार्थ प्रणालीवरील विश्वासालाही या प्रकरणामुळे मोठा धक्का बसला आहे.
विशेष म्हणजे, देशभरात परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेची मागणी होत असताना महाराष्ट्रातील हा प्रकार शिक्षण व्यवस्थेतील प्रशासकीय नियंत्रण आणि देखरेखीतील गंभीर त्रुटी समोर आणतो. त्यामुळे केवळ दोषींवर कारवाई करून हा विषय संपणार नाही, तर शालार्थ प्रणालीचे ऑडिट, नियुक्ती प्रक्रियेची फेरतपासणी आणि डिजिटल पडताळणीची मजबूत यंत्रणा उभारणेही तितकेच आवश्यक असल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात सुरू झाली आहे.
आगामी काळात SIT च्या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता असून, या प्रकरणातील अटकसत्र आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.