Pune News: राज्यातील शिक्षकांसाठी वरिष्ठ वेतनश्रेणी आणि निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच अध्यापक विद्यालयांमधील अध्यापकाचार्यांसाठी हे प्रशिक्षण 13 ते 22 नोव्हेंबर 2026 या कालावधीत जिल्हा आणि तालुकास्तरावर होणार आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) कार्यालयाने यासंदर्भात सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) आणि जिल्हा परिषद कार्यालयांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. प्रशिक्षणाच्या आयोजनासोबतच मूल्यमापनाची पद्धत आणि प्रशिक्षणार्थ्यांसाठीचे निकषही स्पष्ट करण्यात आले आहेत.
या प्रशिक्षणासाठी एकूण 200 गुणांचे मूल्यमापन निश्चित करण्यात आले आहे. त्यात उत्तीर्ण होण्यासाठी किमान 50 टक्के म्हणजेच 100 गुण मिळवणे आवश्यक आहे. मूल्यमापनाचे दोन स्वतंत्र टप्पे असून, प्रत्येक टप्प्यात किमान 25 गुण मिळवणे बंधनकारक आहे.
प्रशिक्षण सुरू असताना 100 गुणांचे मूल्यांकन केले जाईल. यामध्ये तंत्रज्ञानाच्या वापरावर आधारित पाच स्वाध्यायांसाठी 50 गुण, तर लेखी परीक्षेसाठी 50 गुण असतील. प्रशिक्षण संपल्यानंतरच्या 40 दिवसांच्या कालावधीत उर्वरित 100 गुणांचे मूल्यांकन होईल. यात पाच लेखी स्वाध्यायांना 50 आणि प्रकल्प अथवा संशोधन अहवालाला 50 गुण दिले जातील. प्रत्येक स्वाध्यायात किमान पाच गुण मिळवावे लागतील. निर्धारित गुणांची अट पूर्ण न करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्याला अनुत्तीर्ण घोषित केले जाईल. अशा शिक्षकांना नव्याने नोंदणी करून शुल्क भरल्यानंतर पुन्हा प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे.
प्रशिक्षणाच्या व्यवस्थापनाची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे. DIET संस्थांचे प्राचार्य जिल्हास्तरीय प्रमुख असतील, तर तालुकास्तरावर वरिष्ठ अधिव्याख्याता किंवा अधिव्याख्याता केंद्र समन्वयक म्हणून काम पाहतील. आवश्यकतेनुसार केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी किंवा अध्यापकाचार्यांचीही या कामासाठी नियुक्ती करता येईल. संबंधित समन्वयकांना प्रशिक्षणस्थळी पूर्णवेळ उपस्थित राहून नियोजन आणि संनियंत्रण करावे लागणार आहे.
प्रत्येक प्रशिक्षण केंद्रावर किमान 50 आणि कमाल 200 प्रशिक्षणार्थ्यांची व्यवस्था करता येईल. त्यासाठी एका ठिकाणी एक ते चार वर्गांची तरतूद आहे. वर्गखोल्यांची निवड करताना तळमजल्यावरील स्वच्छ आणि सुविधायुक्त जागेला प्राधान्य द्यावे. पिण्याचे पाणी, स्वतंत्र स्वच्छतागृह, इंटरनेट, एलसीडी प्रोजेक्टर आणि स्मार्ट क्लासरूम उपलब्ध असणे अपेक्षित आहे. तसेच आवश्यक वाचनसाहित्य आणि घटकसंचाची तयारी करावी. सुलभक, प्रशिक्षणस्थळ आणि समन्वयकांची माहिती ऑनलाइन प्रणालीवर अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
प्रशिक्षणाच्या प्रत्येक वर्गात सहा ते सात प्रशिक्षणार्थ्यांचे आठ गट तयार करावेत. दोन गटांसाठी एक सुलभक नियुक्त केला जाणार आहे. त्यांच्याकडून निर्धारित निकषांनुसार मूल्यमापन केले जाईल. प्रशिक्षणार्थ्यांना ई-मेलद्वारे प्रशिक्षणाचे ठिकाण, तारीख आणि वेळ कळवावी. भोजन आणि अल्पोपहाराची व्यवस्था नसल्याचेही आधीच स्पष्ट करावे. स्वाध्यायासाठी फुलस्केप कागद आणि वही सोबत आणण्यास सांगावे. पूर्वचाचणी आणि उत्तरचाचणी मोबाइलवर सोडवावी लागणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आणि संबंधित अभ्याससाहित्याचे वाचन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
प्रशिक्षण काळात प्रत्येक तासिकेची उपस्थिती नोंदवून पोर्टलवर अपलोड करावी. यासाठी दैनंदिन स्वाक्षरी पत्रक डाउनलोड करून वापरणे आवश्यक आहे. प्रशिक्षणाच्या शेवटी लेखी चाचणी घेऊन उपस्थिती प्रमाणपत्र द्यावे.
त्यानंतर 40 दिवसांच्या आत पाच स्वाध्याय आणि प्रकल्प अहवाल जमा करण्याच्या सूचना प्रशिक्षणार्थ्यांना द्याव्यात. अहवाल प्राप्त झाल्यानंतर सुलभकांना दोन दिवसांसाठी गुणांकनाकरिता निमंत्रित करावे. विशेष म्हणजे, एकदा पोर्टलवर नोंदवलेले गुण पुन्हा बदलता येणार नाहीत. त्यामुळे मूल्यमापन करताना सर्व निकषांचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.