

Blue Flag Beaches Maharashtra: महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रासाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील तीन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार जाहीर झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लाडघर आणि गुहागर, तसेच रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन या समुद्रकिनाऱ्यांचा २०२६-२७ च्या हंगामासाठी या पुरस्काराच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्राला प्रथमच हा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाला आहे. या यशामुळे राज्याच्या किनारपट्टीला जागतिक पर्यटन नकाशावर नवी ओळख मिळण्यासोबतच स्थानिक रोजगार आणि पर्यटन व्यवसायाला मोठी संधी निर्माण होणार आहे.
आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग ज्युरीने या तिन्ही किनाऱ्यांची निवड केली आहे. पर्यावरणपूरक पर्यटन, समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, पाण्याची गुणवत्ता आणि जैवविविधतेचे संरक्षण या महत्त्वाच्या निकषांवर त्यांची कामगिरी तपासण्यात आली. याशिवाय पर्यटकांसाठी सुरक्षित व्यवस्था, आवश्यक पायाभूत सुविधा आणि किनारपट्टीचे शाश्वत व्यवस्थापन यांचाही विचार करण्यात आला. या सर्व आंतरराष्ट्रीय निकषांची पूर्तता केल्यामुळे लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धनला हा बहुमान मिळाला आहे.
शासकीय यंत्रणांचे सहकार्य
या कामगिरीसाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागासह पर्यटन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालये, जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती आणि बीच मॅनेजमेंट कमिटी यांनी समन्वयाने प्रयत्न केले. स्थानिक नागरिक आणि विविध शासकीय यंत्रणांचे सहकार्यही या प्रक्रियेत महत्त्वाचे ठरले.
१५ नोव्हेंबरपासून ब्ल्यू फ्लॅग हंगामाला सुरुवात
पुरस्कारप्राप्त तिन्ही समुद्रकिनाऱ्यांवर ब्ल्यू फ्लॅगचा हंगाम १५ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे. या पुरस्काराचे अधिकृत प्रतीक असलेला आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग नेदरलँड्समधून प्राप्त होत आहे. तो राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडे सुपूर्द करण्यात येईल. त्यानंतर संबंधित विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून तिन्ही समुद्रकिनाऱ्यांवर ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
देशातील २२ समुद्रकिनाऱ्यांना मान्यता
२०२६-२७ या हंगामासाठी देशातील एकूण २२ समुद्रकिनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग मान्यता मिळाली आहे. यामध्ये आधीच पुरस्कार मिळालेल्या १३ समुद्रकिनाऱ्यांचे नूतनीकरण करण्यात आले असून, नव्याने ९ समुद्रकिनाऱ्यांची निवड झाली आहे. या नव्या यादीत महाराष्ट्रातील तीन किनाऱ्यांचा समावेश होणे हे राज्याच्या पर्यटन आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील महत्त्वाचे यश मानले जात आहे.
इतर समुद्रकिनाऱ्यांचाही आंतरराष्ट्रीय दर्जाने विकास करणार**
या पुरस्कारामुळे केवळ पर्यटनाला चालना मिळणार नाही, तर किनारपट्टीवरील पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फायदा होणार आहे. राज्यातील अन्य पात्र समुद्रकिनाऱ्यांचा आंतरराष्ट्रीय निकषांनुसार विकास करण्यासाठीही ब्ल्यू फ्लॅग कार्यक्रमाचा उपयोग केला जाणार आहे.
जागतिक पातळीवर मिळालेली पावती:पंकजा मुंडे
पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संरक्षण आणि विकास यांचा समतोल साधण्याचे राज्य शासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धनला मिळालेला सन्मान हा स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत पर्यटनासाठीच्या प्रयत्नांना जागतिक पातळीवर मिळालेली पावती असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीची आंतरराष्ट्रीय ओळख अधिक मजबूत होईल. तसेच स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी, पर्यटनाशी संबंधित व्यवसाय आणि किनारपट्टीवरील आर्थिक व्यवहारांना चालना मिळेल, असा विश्वासही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
ब्ल्यू फ्लॅग ही केवळ पर्यटन पुरस्काराची ओळख नसून स्वच्छता, सुरक्षितता, पर्यावरणपूरक विकास आणि शाश्वत पर्यटनाच्या गुणवत्तेची आंतरराष्ट्रीय मान्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी हे यश महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.