Maharashtra TET Exam 2026 News update Sarkarnama
महाराष्ट्र

TET Exam 2026: दादा भुसे यांच्या हस्तक्षेपानंतर TET नियमात बदल; हिजाब वादावर पडदा, धार्मिक स्वातंत्र्याचा सन्मान करणारा निर्णय

Maharashtra TET Exam 2026 News update: महाराष्ट्र टीईटी परीक्षेत मुस्लिम महिला उमेदवारांना हिजाब, दुपट्टा आणि बुरखा परिधान करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाच्या मागणीनंतर शासनाचा महत्त्वाचा निर्णय.

Mangesh Mahale

राज्यभरातील टीईटी परीक्षार्थींसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे! टीईटी परीक्षेत आता मुस्लिम महिला उमेदवारांना हिजाब, दुपट्टा आणि बुरखा परिधान करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाच्या मागणीला अखेर यश मिळालं आहे.

या निर्णयामागे अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा ठरला. संघटनेच्या वतीने शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट घेण्यात आली होती. त्यावेळी विविध शैक्षणिक आणि सामाजिक प्रश्नांवर चर्चा झाली. विशेषतः मुस्लिम महिला उमेदवारांच्या पोशाखासंदर्भातील अडचणी मंत्र्यांसमोर मांडण्यात आल्या.

या चर्चेची गंभीर दखल घेत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी स्वतः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर महिला उमेदवारांना त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेनुसार हिजाब, दुपट्टा, ओढणी आणि बुरखा परिधान करून परीक्षा देण्यास परवानगी देण्यात आली.

मात्र, परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता आणि सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन काही अटी देखील घालण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना आणि पडताळणीवेळी उमेदवारांचा चेहरा स्पष्ट दिसणं आवश्यक असणार आहे. सीसीटीव्ही देखरेखीखाली परीक्षा घेतली जाणार असल्यामुळे कान, डोळे, कपाळ आणि संपूर्ण चेहरा ओळख पटेल अशा पद्धतीने दिसणं बंधनकारक असणार आहे. चेहरा पूर्ण झाकला जाईल अशा प्रकारचे कोणतेही आवरण परीक्षेदरम्यान मान्य केले जाणार नाही, असंही परीक्षा परिषदेनं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या नियमावलीमुळे मुस्लिम महिला उमेदवारांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली होती. अनेकांनी धार्मिक स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक अधिकारांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ मैदानात उतरला आणि शासनाकडे निवेदन देत नियमांमध्ये बदल करण्याची मागणी केली.

आता सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो महिला उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. संघटनेचे संस्थापक साजिद निसार अहमद यांनी या निर्णयाचं स्वागत करत शिक्षणमंत्री दादा भुसे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आणि शासनाचे आभार मानले आहेत. हा निर्णय केवळ धार्मिक भावना जपणारा नाही, तर संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याचाही सन्मान करणारा आहे, असे ते म्हणाले.

महत्त्वाचं म्हणजे, येत्या २८ जून रोजी होणाऱ्या महाराष्ट्र टीईटी परीक्षेसाठी तब्बल ६ लाख २५ हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं.

एकीकडे परीक्षा प्रक्रियेची शिस्त आणि सुरक्षा राखण्याचा प्रयत्न, तर दुसरीकडे महिला उमेदवारांच्या धार्मिक भावना आणि अधिकारांचा सन्मान… या दोन्ही गोष्टींचा समतोल साधण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात आल्याचं आता पाहायला मिळत आहे.

हा निर्णय धार्मिक स्वातंत्र्याचा सन्मान करणारा

अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाने मांडलेल्या न्याय्य मागणीची शासनाने सकारात्मक दखल घेतल्याबद्दल आम्ही समाधान व्यक्त करतो. महाराष्ट्र TET परीक्षेत महिला उमेदवारांना हिजाब, दुपट्टा, ओढणी व बुरखा परिधान करण्यास परवानगी देण्याचा निर्णय हा संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याचा सन्मान करणारा आहे. यामुळे राज्यातील हजारो मुस्लिम महिला उमेदवारांच्या भावना जपल्या गेल्या आहेत. त्यांचा परीक्षेतील सहभाग अधिक सुलभ होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी दिलेल्या स्पष्ट स्पष्टीकरणाचेही स्वागत करतो. हा निर्णय सामाजिक सलोखा, सर्वसमावेशकता आणि समान संधीच्या तत्त्वांना बळ देणारा आहे. भविष्यातही विद्यार्थी, शिक्षक व उमेदवारांच्या न्याय्य मागण्यांबाबत शासन सकारात्मक भूमिका घेईल, अशी अपेक्षा आहे.

साजिद निसार अहमद

संस्थापक तथा राष्ट्रीय सरचिटणीस

अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT