Dahi Handi Insurance: दहीहंडी उत्सवाची चाहूल लागताच राज्यभरातील गोविंदा पथकांनी सरावाला सुरुवात केली आहे. मानवी मनोरे उभारताना सरावादरम्यान अपघात होण्याच्या घटना लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनने यंदा अतिरिक्त सराव करणाऱ्या गोविंदांसाठी विशेष अपघाती विमा योजना जाहीर केली आहे. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत प्रत्येक गोविंदाला १० लाख रुपयांचे विमा संरक्षण, तर अपघात झाल्यास रुग्णालयीन उपचारासाठी दोन लाख रुपयांपर्यंतचा खर्च उपलब्ध होणार आहे.
दहीहंडीपूर्वी अनेक मंडळे दोन ते अडीच महिने सातत्याने सराव करतात. उंच मानवी मनोरे रचताना तोल जाणे, पडणे, हात-पायांना फ्रॅक्चर होणे, डोक्याला किंवा पाठीच्या कण्याला दुखापत होणे, अशा घटना दरवर्षी घडतात. गंभीर दुखापतींमुळे उपचाराचा खर्चही मोठा असतो. ही बाब लक्षात घेऊन सरावादरम्यान गोविंदांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
या योजनेचा कालावधी ७५ दिवसांचा असून ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत विमा संरक्षण लागू राहणार आहे. १४ ते ७० वर्षे वयोगटातील गोविंदांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच ७१ ते ७५ वर्षे वयोगटातील प्रशिक्षक आणि सहाय्यक प्रशिक्षकांनाही या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. प्रत्येक सदस्यासाठी ११० रुपये प्रीमियम भरावा लागणार आहे.
लवकर नोंदणीचे आवाहन
असोसिएशनने राज्यातील सर्व गोविंदा मंडळांना शक्य तितक्या लवकर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी मंडळांनी चर्चगेट येथील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करून प्रीमियम भरावा लागणार आहे.
सरावालाही मिळणार संरक्षण
असोसिएशनच्या माहितीनुसार, ही योजना अधिक कालावधीचा सराव करणाऱ्या मंडळांसाठीच लागू आहे. दरवर्षी श्रीगुरुपौर्णिमेपासून दहीहंडी उत्सवापर्यंत स्वतंत्र विमा संरक्षण योजना राबविण्यात येते. मात्र, त्याआधी सुरू होणाऱ्या सरावादरम्यानही गोविंदांना विमा संरक्षण मिळावे, या उद्देशाने ही अतिरिक्त योजना सुरू करण्यात आली आहे.
दहीहंडी उत्सवात साहसाइतकेच सुरक्षिततेलाही महत्त्व आहे. त्यामुळे सर्व गोविंदा मंडळांनी या विमा योजनेचा लाभ घेऊन सुरक्षित सरावाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनने केले आहे.
या योजनेबद्दल बोलताना महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांनी गोविंदांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, " मे महिन्याच्या अखेरपासून राज्यातील ९० हून अधिक गोविंदा मंडळांनी दहीहंडीचा सराव सुरू केला आहे. प्रो-गोविंदामुळे स्पर्धा वाढली असून प्रत्येक मंडळ अधिक सुरक्षित आणि भक्कम मानवी मनोरे उभारण्यासाठी करून सराव करत आहे. सरावादरम्यानही अपघाताची शक्यता लक्षात घेऊन गोविंदांना आर्थिक संरक्षण मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनच्या प्रयत्नांनी ओरीयंटल इंशुरन्स कंपनीशी वाटाघाटी करून ही विशेष विमा योजना सुरू केली आहे. विमा हा सुरक्षिततेचा पर्याय नसून अतिरिक्त आधार आहे. त्यामुळे सर्व मंडळांनी सुरक्षित सरावासह या योजनेचा लाभ घ्यावा."
विमा योजनेची ठळक वैशिष्ट्ये
१. अपघाती विमा संरक्षण : १० लाख रुपये
२. रुग्णालयीन उपचार खर्च : २ लाख रुपयांपर्यंत
३. विमा कालावधी : ७५ दिवस
४. वैधता : ६ सप्टेंबर २०२६, सकाळी ६ वाजेपर्यंत
५. वयोमर्यादा : १४ ते ७० वर्षे
६. प्रशिक्षक/सहाय्यक प्रशिक्षक : ७१ ते ७५ वर्षे
७. प्रीमियम : प्रति सदस्य ११० रुपये
८. नोंदणी : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, चर्चगेट कार्यालय
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.