Shiv Sena News : एक मानाची हंडी म्हणून कल्याण शहर शिवसेना शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहिहंडी उत्सव साजरा केला जातो. दहिहंडी उत्सवाच्या परवानगी वरून शिवसेना (शिंदे गट) व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात वादाची ठिणगी पडली आहे. याठिकाणी उत्सव साजरा करण्यासाठी पोलिसांनी शिंदे गटास परवानगी दिल्याने ठाकरे गटाने याचा निषेध व्यक्त केला आहे.
पोलीस (Police) प्रशासन दबावाखाली काम करत असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. तर शिंदे गटाने ठाकरे गटास उत्सवात मोठ्या मनाने सहभागी व्हावे असे आमंत्रण दिले आहे. कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात दहिहंडी उत्सव साजरा करण्यात येतो. दहिहंडी उत्सव केवळ आनंदात साजरा होत नाही तर त्यातून विविध सामाजिक संस्था, गरजूंना मदतीचा हात शिवसेनेकडून दिला जातो.
शिवसेनेत (Shivsena) शिंदे व ठाकरे गट अशी फूट पडल्यानंतर यंदा दोन्ही गटाकडून याठिकाणी उत्सव साजरा करण्याची परवानगी पोलीस प्रशासनाकडे मागितली होती. पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाला ही परवानगी दिली आहे. पोलिसांनी शिंदे गटास परवानगी दिल्यानंतर ठाकरे गटाने याचा निषेध केला आहे. ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन बासरे याविषयी म्हणाले शिवसेनेच्या वतीने पहिल्यापासून येथे दहिहंडी उत्सव साजरा केला जात आहे. यंदा शिंदे गटास त्याची परवानगी देण्यात आली आहे. पोलीस दबावाखाली काम करत असल्याची टीका त्यांनी केली.
गेली अनेक वर्ष परंपरेनुसार आम्ही दहिकाला उत्सव साजरा करतो. शिवाय मागील वर्षी जेव्हा शिवसेनेत फूट पडली त्यावेळी देखील ठाकरे गटाने दहिहंडी उत्सव साजरा केला होता. यंदाच ही परवानगी का नाकारण्यात आली. आता शिवसैनिकांची बैठक घेऊन या संदर्भात पुढची दिशा ठरवणार असल्याचे ठाकरे गटाने स्पष्ट केले आहे.
तर याविषयी शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील म्हणाले, पोलिसांनी शिवसेनेला येथे दहिकाला उत्सव साजरा करण्यासाठी रितसर परवानगी दिली आहे. हा उत्सव धार्मिक आहे. कल्याणचे नागरिक, शिवसैनिक म्हणून दहिहंडी उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे. कोणी मालकी हक्क सांगू नये असे प्रतिउत्तर दिले.
Edited by : Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.