मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोशियारी (Bhagatsingh Koshiyari) आक्षेपांना न जुमानता विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्याची राणाभीमदेवी थाटात घोषणा करणारे कॉंग्रेसचे नेते तोंडावर आपटणार असल्याचे आज मंगळवारी दुपारी स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात झालेल्या चर्चेनंतर राज्यपालांच्या विरोधात न जाण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार या वादात सध्या तरी राज्यपालांची सरशी झाली आहे.
राज्यपालाची संमती नसली तरी निवडणूक घेण्याच्या हालचालींवरून कायदे तज्ज्ञांनी ठाकरे सरकारचे कान टोचले असून, अशा पध्दतीने निवडणूक योग्य ठरणार नसल्याचा सल्ला सरकारला दिला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला बॅकफूटरवर यावे लागले आहे. विधानसभेच्या आज जाहीर शेवटच्या दिवसाच्या वेळापत्रकात अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा उल्लेख नव्हता. तरी सरकार अचानकपणे निवडणूक घेऊ शकते, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र तसे घडले नाही.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्तऐवजी आवाजी मतदानाने घेण्याच्या सरकारच्या भूमिकेला विरोध करीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकारचा प्रस्ताव रोखून धरला. त्यानंतर सरकारमधील नेत्यांच्या भेटीनंतर आवाजी मतदान घटनाबाह्य असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावरून राज्यपाल ठाकरे सरकारमध्ये पत्रव्यवहार सुरूच राहिले होते. सरकारने तब्बल तीन वेळा राज्यपालांना या संदर्भात पत्र पाठविले होते. त्यास राज्यपालांनी न जुमानता बारा आमदारांचे निलंबन, निवडणूक पद्धत बदलण्याची गरज काय, असे प्रश्न उपस्थित केले होते.
त्यानंतरही राज्यपाला बाजुला करून निवडणूक घेण्याची तयारी दाखवून काँग्रेस नेत्यांनी कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतला. त्यावर बैठकांचा सपाटा घेतल्याचे बोलले गेले. त्यानंतर मात्र, राज्यपालांच्या परवानगीला डावलून अध्यक्षपदाची निवडणूक घेता येणार नाही. तसे पाऊल न उचलण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मात्र आपला हिरमोड झाल्याचे दाखवून काँग्रेस नेत्यांनी विरोधी पक्ष भाजप नेत्यांनी राज्यपालांचे कान भरल्याने ही निवडणूक होऊ शकलेली नसल्याचा आरोप करीत काँग्रेसने आपल्यावरील बदनामीचे बालंट भाजपवर ढकलले.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून १२ आमदारांचे निलंबन मागे घेण्याबाबत भाजप नेत्यांनी सरकारकडे प्रयत्न केले होते. या आमदारांनी तसे पत्रही विधानसभा अध्यक्षांकडे दिले होते. तरीही या आमदारांना पुन्हा सभागृहात घेण्याची तयारी ठाकरे सरकारने दाखविली नाही. त्यातून राज्यपालांनीही ठाकरे सरकारचा निवडणूक घेण्याचा प्रस्ताव एकप्रकारे धुडकावून लावल्याचे सांगण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.