स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांवर येत असताना महायुती सरकारने आणखी एक महत्त्वाची योजना जाहीर केली आहे. विधानसभा निवडणुकीत ‘लाडकी बहीण’ योजनेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर सरकारकडून केलेली ही आणखी एक महत्वाची घोषणा मानली जात आहे.
राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकारने ब्राह्मण, राजपूत आणि आर्यवैश्य समाजातील तरुणांसाठी ‘कर्जव्याज परतावा योजना’ लागू केली आहे. या निर्णयामुळे तिन्ही समाजातील सुशिक्षित पण बेरोजगार तरुणांना व्यवसाय आणि उद्योगासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या योजनेअंतर्गत पात्र तरुणांना कर्ज मिळेल आणि त्यांनी घेतलेले कर्ज हप्त्यांनुसार वेळेवर फेडले, तर त्यांना भरलेले व्याज परत दिले जाणार आहे. त्यामुळे नवउद्योजकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने परशुराम महामंडळाची स्थापना करत 10 कोटींचा निधी दिला होता. त्याआधी ब्राह्मण समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या 10 टक्के आरक्षणाचाही लाभ देण्यात आला होता. आता प्रथमच ब्राह्मण, राजपूत आणि आर्यवैश्य समाजासाठी स्वतंत्र आर्थिक योजना सुरू झाल्याने या समाजांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
योजनेनुसार, दरवर्षी प्रत्येकी 50 लाभार्थ्यांना 15 लाख रुपयेपर्यंत कर्ज दिले जाईल. हे कर्ज नियमितपणे फेडल्यास साडेचार लाख रुपये पर्यंत व्याजाची रक्कम संबंधित महामंडळाकडून थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. गट कर्ज योजनेत 50 लाखांपर्यंत मंजूर झालेल्या कर्जावरही व्याज परताव्याची सुविधा असेल. मात्र या गट योजनेत कमाल मर्यादा 15 लाख रुपये इतकी असेल.
महत्वाची अट अशी की लाभार्थ्यांनी कर्जाचा हप्ता भरल्यानंतर 15 दिवसांच्या आत महामंडळाला माहिती देणे आवश्यक आहे, अन्यथा व्याज परताव्याचा लाभ मिळणार नाही. या योजनेमुळे ब्राह्मण, राजपूत आणि आर्यवैश्य समाजातील तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला आधार मिळेल आणि निवडणुकीच्या तोंडावर या समाजांमध्ये सरकारबद्दल सकारात्मकता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या वेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आणि आर्य वैश्य समाजासाठी वासवी कन्यका आर्थिक महामंडळाची स्थापना केली होती. ही महामंडळे केवळ कागदावरच होती, पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने पहिल्यांदाच या महामंडळांच्या माध्यमातून ब्राह्मण, राजपूत आणि आर्य वैश्य समाजासाठी ही स्वतंत्र आर्थिक योजना जाहीर करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.