Ravindra Chavan Eknath Shinde sarkarnamRavindra Chavan Eknath Shindea
महाराष्ट्र

MahaYuti seat sharing : विधानपरिषद निवडणूक : महायुतीचा तिढा 'त्या' एका जागेवरून आडला; एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाणांच्या बैठकीत नेमके काय घडले?

Maharashtra local body election News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित बैठक पार पडली.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील रिक्त असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 17 जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सोमवारपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसापासून महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. शनिवारी दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीमधील जागावाटपाचा तिढा केवळ एका जागेवरून अडला असल्याचे पुढे आले आहे. आता याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या बैठकीतच घेतला जाणार असल्याचे समजते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 जागांवर निवडणूक होत आहे. सध्या जागावाटपावरुन महायुतीमध्येच सामना रंगला आहे. शनिवारी पार पडलेल्या महायुतीच्या बैठकीतही यावर अंतिम तोडगा निघाला नसून केवळ एका जागेवर तिढा कायम आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने (Shivsena) या निवडणुकीत 7 जागांवर ठाम दावा केला आहे. शिवसेनेने भाजपसमोर आधीच्या 5 आणि नव्याने ताकद वाढलेल्या 2 अशा एकूण 7 जागांचा अधिकृत प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे. भाजपने शिवसेनेला केवळ 3 ते 4 जागा देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, आता केवळ एका जागेवरुन घोडे अडले आहे.

गेल्या चार दिवसापासून सुरु असलेल्या बैठकीमुळे विधान परिषद निवडणुकीच्या जवळपास सर्वच जागांवर महायुतीत एकमत झाले आहे. मात्र, शिवसेनेला हवी असलेली अजून एक जागा भाजप (BJP) सध्या तरी सोडण्यास तयार नाही, त्यामुळे घोडे अडले. त्याच, पार्श्वभूमीवर शनिवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर, लागलीच सुनील तटकरे यांनी देखील एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. या भेटींमध्ये जवळपास सर्वच जागांवर एकमत झाले असल्याचे समजते.

ठाण्यातील जागेवरून आडले घोडे

ठाणे विधान परिषदेच्या जागेवर भाजपने दावा केला आहे. याठिकाणी भाजप नगरसेवकांचे संख्याबळ जास्त असल्याने ही जागा भाजपलाच मिळावी, अशी मागणी भाजप आमदार संजय केळकर यांनी केली आहे. ठाण्यात भाजपचे 444 नगरसेवक असून शिवसेना व जिजाऊ संस्थेची संख्या 346 असल्याचा दावा त्यांनी केला आहे. महायुतीच्या चर्चेत भाजपची भूमिका मजबूत असून ठाणे विधानपरिषदेसाठी ठाणे जिल्ह्यातीलच चेहरा उमेदवार असेल, असेही केळकर यांनी सांगितले. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या पारंपरिक मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे ठाणे मतदार संघावरून घोडे आडले आहे.

महायुतीमध्ये सुरुवातीला जो प्राथमिक फॉर्म्युला ठरत होता, त्यानुसार भाजप 12 जागा, शिवसेना 3 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार असल्याची चर्चा होती. महायुती म्हणून एकत्र लढण्यावर तीन पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे एकमत झाले आहे. काही पारंपरिक जागांची अदलाबदल केली जाणार असल्याचे कळत आहे. त्यातच, रायगड जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेकडूनही उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू आहे. यासोबतच, शिवसेनेकडून आणखी एका जागेची मागणी करण्यात आली. आता, यावर अंतिम निर्णय देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या बैठकीतच निघणार आहे.

SCROLL FOR NEXT