

Mumbai News: महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनी प्रचंड वेग धरला आहे. या निवडणुकीत सध्याच्या संख्याबळावर महायुतीचं पारडं जड असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. याचदरम्यान, महायुतीच्या गोटातून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तसेच या निवडणुकीचा निकाल 22 जूनला जाहीर लागणार आहे.या निवडणुकीसाठी एकीकडे महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे या जागावाटपासाठी महायुतीतील भाजप,अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना या तीनही पक्षांनी आपल्या दिग्गज नेत्यांवर मोठी जबाबदारी दिली आहे.
महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी विधान परिषदेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्याची जबाबदारी आपआपल्या पक्षातील विश्वासू नेत्यांकडे सोपवली आहे. या तीनही प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वात महायुतीचा जागावाटपाची गाडी पुढे सरकणार आहे.
भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेनेकडून शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हसन मुश्रीफांवर विधान परिषदेच्या जागावाटपाची धुरा देण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
महायुतीच्या नेत्यांमध्ये विधानपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांतील संख्याबळानुसार प्राथमिक चर्चा सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्याच्या संख्याबळानुसार विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप सर्वाधिक 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला दोन जागा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या जागावाटपासाठी महायुतीकडून समन्वय समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातूनच जागावाटपाची चर्चा पुढे जाणार आहे. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे,शिवसेनेचे शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ हे दिग्गज नेतेमंडळी विधान परिषदेच्या जागावाटपाचा तिढा कसा सोडवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महायुतीच्या या समन्वय समितीच्या प्रमुख नेत्यांमध्ये जागावाटपासंदर्भात प्राथमिक चर्चेला सुरूवात झाल्याची माहिती आहे. या समन्वय समितीच्या चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला ठरवला जाईल. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बैठकीत अंतिम जागा वाटपावर शिक्कामोर्तब करतील असं बोललं जात आहे.
महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधान परिषदेच्या निवडणुकीत जागांची अदलाबदल करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. पुढील आठवड्यात महायुतीतील जागावाटप निश्चित होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
एकीकडे महायुतीकडे विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुकांची मोठी रांग आहे. यापैकी काही इच्छुकांना भाजप,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी विधानसभा निवडणुकीवेळी माघार घेताना विधानपरिषदेचा शब्द दिल्याचंही बोललं जात आहे. अशा नेत्यांना यावेळी संधी मिळाली नाही,तर त्यांच्या नाराजीचा मोठा फटका महायुतीला बसण्याची शक्यता आहे.
या सगळ्या बाबी लक्षात घेता महायुतीतील भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे,शिवसेनेचे शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ हे दिग्गज नेतेमंडळी कसा मार्ग काढतात हे काही दिवसांत स्पष्ट होणारच आहे. तरी विधान परिषदेच्या जागावाटपाचा तिढा सोडवताना या तीनही नेत्यांचा कस लागणार हे निश्चित आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.