Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 17 जागांच्या निवडणुकीसाठी उद्या (सोमवारपासून) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महायुतीमधील तीन मित्रपक्षांत सध्या जागावाटपावरून खल सुरु आहे. राज्यात महायुतीच्या जागावाटपावर एकमत होत नसल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे एकीकडे चार जागेवरून भाजप व शिंदे शिवसेनेत जोरदार रस्सीखेच दिसत आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा दिल्ली दरबारी पोचला आहे. एकीकडे शिंदेंची शिवसेनेकडून सहा जागांची मागणी केली जात असताना भाजप मात्र तीन जागा देण्यास तयार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षात चुरस आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी एक ते दोन जागांची भाजप-शिंदे शिवसेनेत अदलाबदली होण्याची शक्यता आहे.
निवडणुकीची घोषणा झाल्यापासून महायुतीच्या नेत्याच्या बैठकीचा सिलसिला सुरु आहे. सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असल्याने 17 जागांवर महायुतीचा फॉर्म्युला जवळपास ठरला असला तरी एक-दोन जागेवरून दोन्ही पक्षात एकमत झाले नाही. शिवसेनेला (Shivsena) हवी असलेली छत्रपती संभाजीनगर, जालना ही जागा भाजप शिवसेनेस सध्या तरी सोडण्यास तयार नाही, त्यासोबतच ठाणे व नाशिकच्या जागेवरून दोन्ही पक्षाचे घोडे अडले आहे.
दरम्यान , या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर, लागलीच सुनील तटकरे यांनी देखील एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. मात्र, ठाणे विधान परिषदेच्या जागेवर भाजपने दावा केला आहे. याठिकाणी भाजप नगरसेवकांचे संख्याबळ जास्त असल्याने ही जागा भाजपलाच मिळावी, अशी मागणी भाजप आमदार संजय केळकर यांनी केली आहे. ठाण्यात भाजपचे 444 नगरसेवक असून शिवसेना व जिजाऊ संस्थेची संख्या 346 असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे ठाणे मतदार संघावरून घोडे आडले आहे.
ठाणे-पालघर, छत्रपती संभाजीनगर-जालना, जळगाव व यवतमाळच्या जागेवरून दोन्ही पक्षाचे घोडे अडले आहे. त्यामुळे ऐनवेळी या चार मतदारसंघाच्या बदल्यात अदलाबदली करून दुसरा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देणार का? याची उत्सुकता लागली आहे. त्यातच पुण्याच्या जागेवरूनही भाजप व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस दिसून येत आहे. त्यामुळे ऐनवेळी काही जागांची अदलाबदली होण्याची शक्यता असल्याने नेत्यांची धाकधूक वाढली आहे.
महायुतीमध्ये सुरुवातीला प्राथमिक फॉर्म्युला ठरला होता, त्यानुसार भाजप 12 जागा, शिवसेना 3 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार असल्याची चर्चा होती. महायुती म्हणून एकत्र लढण्यावर तीन पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे एकमत झाले होते. काही पारंपरिक जागांची अदलाबदल केली जाणार असल्याचे कळत होते. आता, यावर अंतिम निर्णय देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या बैठकीतच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे या बैठकीनंतर जागावाटपाचा फॉर्म्युल्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुतीमधील पक्षांच्या दाव्यानुसार जागांची प्राथमिक विभागणी खालीलप्रमाणे आहे.
1. भाजप (12 जागा):
नागपूर, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर-जालना, सातारा-सांगली, पुणे, जळगाव, नांदेड, भंडारा-गोंदिया, अमरावती, लातूर-धाराशीव-बीड आणि सोलापूर.
2. शिवसेना (3 जागा):
ठाणे, नाशिक आणि यवतमाळ.
3. राष्ट्रवादी काँग्रेस (2 जागा):
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि हिंगोली-परभणी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.