Mumbai News : येत्या आठवडाभरात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असताना जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत नसल्याने सर्वच पक्षांतील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दोनदिवसीय दौऱ्यानंतरही सत्ताधारी महायुतीचे जागावाटप रखडलेले आहे. भाजपने आपल्या ३५ उमेदवारांची यादी तयार ठेवली असल्याची चर्चा जोरात आहे. त्यामुळे महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला ९ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला केवळ ४ जागा सोडण्याची तयारी दर्शवली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला ९ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात नाराजी आहे. (Mahayuti Seat Sharing News)
या प्रमुख पक्षांना जागा मिळत असल्या तरी सोबत येणाऱ्या रिपब्लिकन पार्टी, रासप, रयत क्रांती या इतर छोट्या पक्षांना अजून तरी जागा देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या छोट्या पक्षांच्या वाट्याला किती जागा येणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. त्यातच महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटत नसताना घटक पक्षांचा एकमेकांच्या जागांवर डोळा असल्याचे दिसत आहे. त्यामुळे काही जागांवरून रस्सीखेच पाहावयास मिळत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दोनदिवसीय दौऱ्यावेळी सत्ताधारी महायुतीच्या घटक पक्षात जागावाटपाबाबत चर्चा झाली होती. त्यावेळी काहीच मार्ग निघाला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा करण्याचे ठरले होते. त्यानुसार शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी सकाळी दिल्लीत जागावाटपाबाबत बैठक होण्याची शक्यता आहे. यामध्ये सन्मानजनक जागा द्या, अशी मागणी शिवसेना शिंदे गट (Shivsena) व राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) अजित पवार गट या दोन्ही पक्षांनी भाजपच्या नेतृत्वाकडे केली असल्याचे समजते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महायुतीमधील घटक पक्षांकडून जागा वाढवून देण्यासाठी दबाव वाढवला जात असतानाच आता दुसरीकडे काहीही झाले तरी ३४ पेक्षा कमी जागा घेऊ नका, असा दबाव पक्षश्रेष्ठींवर भाजपच्या (Bjp) नेत्यांनी टाकला आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या जागावाटपाच्या बैठकीत यावरून महायुतीत खटके उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
R