Mumbai : मुंबईतील माहिम विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीसमोर पेच निर्माण झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र व या मतदारसंघातील उमेदवार अमित ठाकरे यांच्यासाठी माघार घेण्याची विनंती महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांना केली जात आहे. मात्र, त्यांनी थेट अमित ठाकरेंनी माघार घेण्याबाबतचे सूचक विधान केले आहे.
सदा सरवणकर यांनी बुधवारी एक ट्विट करत राज ठाकरेंनाच भावनिक साद घातली आहे. मी चाळीस वर्षापासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. आम्ही आमच्या कष्टाने आणि घामाने तीन वेळा माहिमचा आमदार झालो, असे सांगत सरवणकर यांनी आपण लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
बाळासाहेब असते तर त्यांनी मला आपल्या नातेवाईकांसाठी सीट सोडायला सांगितलं नसतं. त्यांचे पन्नास नातेवाईक दादर-माहिम मध्ये राहतात. पण उमेदवारी त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिली. ते कार्यकर्त्याची भावना जपणारे नेते होते, असे सरवणकरांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहा, त्यांचे सुपुत्र हे तीन वेळचे खासदार असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुलाला केंद्रात मंत्री बनवले नाही, तर एका निष्ठावंत शिवसैनिकाला ती संधी दिली. राजसाहेबांना मी विनंती करतो, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय करू नका. मला आपले समर्थन द्या, असे आवाहन सरवणकर यांनी केले आहे.
सरवणकर यांचे हे ट्विट चर्चेत आले आहे. त्यानंतर त्यांनी मीडियाशी बोलताना राज ठाकरेंना भेटूनही ही विनंती करणार असल्याचे म्हटले आहे. सरवणकरांच्या या भूमिकेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चांगलीच कोंडी झाली आहे. भाजपने अमित ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता शिंदे सरवणकरांचे मन वळविण्यात यशस्वी ठरणार की सरवणकर ठाकरेंविरोधात लढणार, याविषयी उत्सुकता वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.