Mumbai News: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडावरील दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 500 कोटी रुपयांच्या कथित देवाण-घेवाणीचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी मेळाव्यातील आपल्या भाषणात शिंदेंना "माझं नाव सांगून तुम्ही दिल्लीतून भाजपच्या लोकांकडून 500 कोटी रुपये आणले आहेत का? आणि हे पैसे मला दिलेत असं तुम्ही त्यांना सांगितलंय का?" अशी थेट विचारणा केली होती. यावर शिंदेंसह शिवसेनेच्या नेत्यांनी हे आरोप फेटाळून लावले तसेच चॅलेंजही दिले होते. यानंतर जरांगेंनी पत्रकार परिषद घेत एक खळबळ उडवणारी ऑडिओ क्लिप समोर आणली आहे. या क्लिपनंतर आता रामदास कदम यांनी मोठं पाऊल उचललं आहे.
मनोज जरांगे पाटलांनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपकडून 500 कोटी रुपये घेऊन खासदार श्रीकांत शिंदेंच्या हस्ते मनोज जरांगेंना पाठवल्याचा उल्लेख या ऑडिओ क्लिपमध्ये असल्याचं समोर येत आहे. या ऑडिओ क्लिपबाबत भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये तूतू-मैमै सुरू आहे.
माजी मंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी तातडीनं प्रसिद्धीपत्र काढत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना आव्हान दिले आहे. त्यांनी या ऑडिओ क्लिपमधील सर्व भाजपाचे नेते आहेत,एकही आमचा नेता नाही. संबंधित ऑडिओ क्लिपची सत्यता तपासण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनाच पत्र लिहिल्याची माहितीही समोर आली आहे.
रामदास कदम यांनी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सादर केलेल्या ऑडिओ क्लिपची चौकशी वरिष्ठ पातळीवरून होणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. तसेच या चर्चेत कोण कोण बोलत आहेत? त्यातील आवाज नेमका कोणाचा आहे? संभाषण करणारी महिला कोण? याची तत्काळ चौकशी करण्यात यावी. तसेच सदर ऑडिओ क्लिपमध्ये झालेल्या 500 कोटींच्या आरोपाबाबतची स्पष्टता महाराष्ट्राच्या जनतेसमोर यावी, अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह तसेच मोहन भागवत यांना पत्र लिहून केली आहे.
या ऑडिओ क्लिपची चौकशी करावी म्हणजे 'दूध का दूध पानी का पानी' होऊन जाईल, असंही कदम यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांना हेतुपुरस्कर बदनाम करण्याचा हा षडयंत्र असल्याचा आरोपही माजी मंत्री रामदास कदम यांनी केला आहे.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन कॉन्फरन्स कॉलद्वारे झालेल्या संवादाची एक ऑडिओ क्लिप पत्रकारांना दिली. "या ऑडिओ क्लिपनंतर विधानसभेच्या निवडणुक झाल्या,लोकसभेच्या निवडणुक झाल्या. पण अचानक हा विषय २ वर्षांनंतर जरांगे पाटीलांच्या मार्फत समोर आला. या ऑडिओ क्लिपची चौकशी वरिष्ठ पातळीवरुन होणे गरजेचे आहे.या चर्चेमध्ये BJP पक्ष कसा वाढवला पाहिजे याची देखील चर्चा ३० मिनिटे आहे. सदर बाब ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, मोहन भागवत यांच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे," असंही कदम यांनी म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट राजधानी दिल्लीतून जरांगे पाटलांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं होतं. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या 500 कोटींच्या आरोपांवर आमचे प्रवक्ते, नेते बोलताहेत. कुणाला 500 कोटी दिलेही नाही आणि घेतलेही नाही. ते देण्याचा प्रश्नही नाही ,असं स्पष्ट केलं होतं. तसंच ज्याकाही आधारावर जरांगे पाटील हे बोलताहेत, त्याची अगोदर शहानिशा त्यांनी करायला पाहिजे होती. शहानिशा करुनच त्यांनी बोलायला पाहिजे होतं, असंही त्यांनी म्हटलं होतं.
तसेच मनोज जरांगे यांच्याकडे 500 कोटींच्या जे काही पुरावे असतील, तेही त्यांनी संबंधित यंत्रणांकडे द्यावेत. त्याची चौकशी झाली पाहिजे. दुध का दुध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे. एवढंच याप्रसंगी मी सांगतो. एकनाथ शिंदेला महाराष्ट्र, तसेच संपूर्ण देश ओळखतो,असंही शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
माझ्या कामाची पद्धत सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंचं नाव घेतलं की,हेडलाईन होते. म्हणूनच बरेच लोक नावं घेतात. मनोज जरांगे हे मराठा समाजाचं काम करताहेत.मराठा समाजाचं काम त्यांनी केलं पाहिजे. ते समाजाचं काम करत होते, म्हणूनच मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केल्याचंही शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांना सांगितलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.