Manoj Jarange Patil sarkarnama
महाराष्ट्र

Manoj jarange Patil : मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याला 9 दिवसांनी परवानगी; एक दोन नव्हे पोलिसांनी घातल्या तब्बल 16 अटी

Roshan More

Manoj Jarange Patil News : मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायण गड येथे दसरा मेळावा घेणार असल्याचे जाहीर केले होते. या दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी म्हणून 30 सप्टेंबरला शिरुर (कासार) पोलिस ठाण्यात परवानगी मागितली होती. मात्र, आठ दिवस उलटून गेले तरी पोलिसांची परवानगी मिळत नसल्याचे मराठ समाज आक्रमक झाला होता. अखेर आज (बुधवारी) पोलिसांनी दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे.

पोलिसांनी मेळाव्याला परवानगी देत असताना एक दोन नव्हे तर 16 अटी घातल्या आहेत. मेळाव्यात प्रक्षोभक भाषण तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य करणार नसल्याची देखील अट घालण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या मेळाव्याला परवानगी मिळणार की नाही, याची उत्सुकता होती. अखेर जरांगे पाटील यांना परवानगी मिळाली. विधानसभा निवडणुकीच्या आधी होणार हा मेळावा महत्त्वाचा मानला जातो आहे. या मेळाव्यातून मनोज जरांगे पाटील आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार का? याची देखील उत्सुकता असणार आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील आग्रही आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आरक्षण देण्यात अडथळा निर्माण करत असल्याची टीका देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली होती.तसेच आरक्षण मिळाले नाही तर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्या विषयी निर्णय घेऊ असे देखील जरांगे पाटील म्हणाले होते. त्यामुळे दसरा मेळाव्यात जरांगे पाटील काय बोलतात, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष असणार आहे.

पोलिसांनी मेळाव्यासाठी घातलेल्या अटी

1) दसरा मेळावासाठी येणारे वाहनांसाठी पार्किंगची पुरेशी व्यवस्था करावी. सदर ठिकाणी स्वयंसेवक नेमावेत.

2) पार्कंगकडे जाणारे रोडवर बॅरीगेटसच्या ठिकाणी स्वयंसेवक नेमावेत.

3) श्रीक्षेत्र नारायणगडकडे येणाऱ्या सर्व रस्त्यावरील गावांच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणुन प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवक नेमावेत.

4)श्रीक्षेत्र नारायणगड येथे येणाऱ्या चारही मार्गावर टोईंग व्हॅन ठेवाव्यात

5) मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सभेसाठी येणारे कमीत कमी वाहने यांची निश्चिती करुन त्याची माहिती बंदोबस्त अधिकारी यांना आधीच द्यावी.

6) मनोज जरांगे पाटील यांचा मेळावा ठिकाणी येण्याचा व परत जाण्याचा मार्ग निश्चित करुन त्याबाबत बंदोबस्त प्रभारी अधिकारी यांना माहिती द्यावी.

7) मेळाव्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी पुरेशा पाण्याची व्यवस्था करावी.

8)मेळाव्यामध्ये प्रक्षोभक भाषण तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करणार नाहीत.

9) सर्वोच्य न्यायालयाच्या ध्वनीक्षेपक बाबतचे नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

10) मेळाव्या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या एलईडी सुरकिषीत अंतरावर लाऊन विद्युत प्रवाहाची पुरेशी व्यवस्था करावी.

11) मेळाव्याच्या ठिकाणी असलेल्या स्टेजच्या बाजुची विद्युत पोल वरील विद्युत वाहिनी प्रवाह बंद करुन विद्युत रोहित्रच्या ठिकाणी स्वयंसेवक नेमून त्यास हजर ठेवावे

12) आयोजकांकडुन दसरा मेळाव्यासाठी येणारे लोकांना वाटप करण्यात येणाऱ्या अन्नातून बाधा होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.

13) दसरा मेळावा कार्यक्रम संपन्न झाला नंतर स्वयंसेवक नेमलेल्या ठिकाणी गर्दी वाहतूक कमी होई पर्यंत हजर राहून प्रशासनास सहकार्य करणे बाबत सुचना द्यावी.

14) दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या महिलांची व लहान मुलांची बसण्याची स्वतंत्र व सुरक्षित व्यवस्था करावी.

15) श्रीक्षेत्र नारायणगड मंदीराचे परिसरात स्वयंसेवकांची नेमणूक करावी.

16) दसरा मेळाव्या ठिकाणी आयोजीत करण्यात येणारे रावण दहन हे लोकांपासून सुरक्षित अंतरावर करुन सदर ठिकाणी सुरक्षित अंतरावर स्वयंसेवकांची नेमणूक करावी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT