Maratha Morcha News : मराठा आरक्षण उपसमितीला ओबीसी आरक्षण उपसमितीच्या धर्तीवर थेट निर्णय घेण्याचे अधिकार द्या, अन्यथा ही समितीच बरखास्त करा, अशी आक्रमक मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यातील समन्वयकांनी शिर्डी येथे पार पडलेल्या बैठकीत केली आहे. तसेच, समितीला निर्णय घेण्याचे अधिकारच नसून अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे केवळ मुख्यमंत्री आणि आंदोलनकर्त्यांमधील 'पोस्टमन' म्हणून काम करणार असतील, तर त्यांनी तातडीने अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, असा एकमुखी सूर या बैठकीत उमटला. यावेळी मनोज जरांगे यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत विविध मागण्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
शिर्डी येथे मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समन्वयकांची महत्त्वाची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत मराठा आरक्षण उपसमितीची कार्यपद्धती आणि समाजाच्या इतर प्रलंबित मागण्यांवर खल झाला. समितीला धोरणात्मक आणि निर्णायक अधिकार नसल्यामुळे केवळ निरोप पोहोचवण्यापुरते काम उरले असल्याचा आरोप समन्वयकांनी केला. याबाबत समन्वयक करण गायकर यांनी आपली भूमिका मांडली.
मराठा आरक्षणाचा लढा सुरुवातीला मराठवाड्याला केंद्रस्थानी ठेवून सुरू झाला होता. मात्र, मनोज जरांगे यांनी हे आंदोलन राज्यव्यापी केल्यामुळे मराठवाड्यातील मराठ्यांच्या मूळ मागण्या मागे पडल्याचा मुद्दा बैठकीत मांडण्यात आला. मराठवाड्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याचा शब्द राज्य सरकारने देऊनही अद्याप ती बैठक झालेली नाही. हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ही बैठक न झाल्यास, अधिवेशन काळात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समन्वयक किशोर चव्हाण यांनी दिला.
ज्या मागण्या व्यावहारिकदृष्ट्या मान्य होऊ शकत नाहीत, अशा मागण्या मनोज जरांगे यांनी मांडल्यामुळे त्यांची अपरिपक्वता समोर आल्याची टीका समन्वयक संजीव भोर यांनी केली. जरांगे हे समाजातील अभ्यासकांना विश्वासात न घेता केवळ स्वतःलाच एकमेव नेता म्हणून पुढे आणत आहेत. यामुळे समाजाचे नुकसान होत असल्याने मराठा क्रांती मोर्चा पुन्हा एकदा मैदानात उतरला असल्याचे भोर यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आज मराठा समाजाची दयनीय अवस्था झाली असून, आरक्षणासह समाजाच्या भवितव्यासाठी अनेक ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. गेल्या एक-दीड वर्षांपासून शासनाकडून मराठा समाजाविरोधात वातावरण तयार केले जात असल्याची शंका व्यक्त होत आहे. त्यामुळेच समाजाचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा पुन्हा अधिक जोमाने सक्रिय झाल्याची प्रतिक्रिया समन्वयक ज्योती मेटे यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.