Manoj Jarange Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : जरांगेंच्या ताफ्याची काय आहे खासियत? खर्च कोण करतं?

Anand Surwase

Maratha Aarakshan News : देखो देखो मराठे आ गए..हा कोणा आमदार,खासदाराचा ताफा नाही; हा ताफा आहे मराठ्यांचा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा!' सध्या अशा प्रकारच्या आशयाचे अनेक व्हिडिओ अनेकांच्या व्हाॅट्सॲप स्टेटस, इन्टा, फेसबुकच्या रिल्सवर पाहायला मिळत आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मराठा योद्धा जरांगे पाटील सध्या गावाच्या पारापासून ते न्यूज चॅनलच्या कट्ट्यापर्यत चर्चेत आहेत. जरांगे पाटलांच्या नावाची क्रेझ तर आहेच, पण त्यांचा महाराष्ट्राचा दौऱ्यात आणखी एक आकर्षणाचा मुद्दा ठरतोय तो म्हणजे त्यांच्या वाहनाचा ताफा. त्यांच्या या ताफ्याची खासियत काय आहे? त्याचे नियोजन कसे आहे, त्याबाबतचा आढावा जाणून घेऊयात..

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रभर वणवा पेटवला आहे. यासाठी ते पायाला भिंगरी बांधून अवघ्या महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत. आरक्षणाच्या आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात त्यांनी महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या गाठीभेटी आणि मराठा संवाद मोहीम सुरू केली आहे.

यापू्र्वी 30 सप्टेंबरला त्यांनी अंतरवाली सराटीमधून आपला 12 दिवसांचा महाराष्ट्र दौरा सुरू करून 13 जिल्ह्यात सुमारे 90 गावांमध्ये भेटी देत सभा घेतल्या. त्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यात 15 नोव्हेंबरपासून 23 नोव्हेंबर हा 9 दिवसांचा पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा असा दौरा सुरू केला आहे.

या त्यांच्या दौऱ्यात जरांगे पाटील यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीमधून कशा प्रकारे हक्काचे आरक्षण मिळू शकते, यापूर्वी का मिळाले नाही, याबाबत जनजागृती करत आहेत.

जरांगेंच्या दौऱ्यासाठी 35 वाहनांचा ताफा

मराठा आरक्षणाच्या आंदोलनात अंतरवाली सराटी आणि जालना जिल्ह्यातील इतर काही गावांचा पुढाकार राहिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात अंतरवाली सराटी आणि आसपासच्या गावातून तब्बल 35 वाहनांचा ताफा सहभागी झाला आहे.

शिवबा संघटनेच्या माध्यमातून हे सर्व मराठा समाजसेवक जरांगे यांच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालत आहेत. ताफ्यात सहभागी झालेली सर्व वाहने मराठा आंदोलकांनी स्वयंस्फूर्तीने जरांगे पाटील यांच्या दौऱ्यासाठी उपलब्ध करून दिली आहेत. या सर्व वाहनांच्या इंधनाचा खर्च देखील जालना जिल्ह्यातील गोदाकाठच्या 123 गावातील नागरिकांकडून केला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिस्तबद्ध ताफ्याचे चोख नियोजन

जरांगे पाटील यांच्या वाहनांच्या ताफ्याचे चोख नियोजन अंतरवाली सराटीपासून त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांकडून केले जात आहे. यासाठी एक स्वंतत्रपणे प्रोटोकॉल ठरवण्यात आला आहे. जरांगे पाटील यांच्या गाडीपुढे किती गाड्या असतील मागे किती असतील?

पुढे मागे चालणाऱ्या गाडीच्या चालकांनी घ्यावयाची काळजी या सर्व सूचना संबंधित चालकांना आणि कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व वाहनांचा ताफा एखाद्या मंत्र्याच्या ताफ्याप्रमाणे शिस्तबद्ध पद्धतीने सर्वांच्या गाठीभेटी घेत पुढे मार्गस्थ होताना दिसून येतो.

तसेच रस्त्यात सत्कार स्वीकारण्यासाठी जरांगे पाटील थांबणार असतील संपूर्ण ताफ्याचा इतर वाहतूक व्यवस्थेला अडथळा होणार नाही, याची काळजी घेत ताफा रस्त्याच्या बाजूला घेतला जातो. जरांगे पाटील यांच्या सोबतचे कार्यकर्ते वाहनातून खाली उतरून लगेचच सुरक्षेच्या दृष्टीने पाटील यांच्या बाजूच्या गर्दीचे नियंत्रण करण्याचे काम चोखपणे पार पाडतात.

ताफ्यात पोलिस आणि डॉक्टरांची उपस्थिती

जरांगे पाटील यांच्या वाहनांच्या ताफ्यासोबत पोलिस प्रशासनाचेही एक वाहन सहभागी आहे. त्याच सोबत दौऱ्याच्या ठिकाणच्या जिल्हा पोलिस प्रशासनाकडूनही जरांगे यांच्या ताफ्यात वाहतूक पोलिस समावेश केला जातो.

त्यामुळे त्यांच्या ताफ्याला एखाद्या मंत्र्याच्या दौऱ्याचे स्वरूप प्राप्त होते. याच बरोबर जरांगे पाटील यांच्या या दौऱ्यात डॉक्टरांचाही समावेश आहे. डॉक्टरांकडून जरांगे पाटील यांच्यासह दौऱ्यात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.

जेवणाच्या डब्यांसाठी स्वतंत्र वाहन

जरांगे पाटील यांच्या दौऱ्यात जवळपास १५० कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यामुळे या सर्वांच्या खाण्यापिण्याची सोय करण्यासाठी ताफ्यात एक स्वंतत्र वाहन उपलब्ध आहे. या वाहनातील कार्यकर्त्यांकडून नियमितपणे पाटील यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांच्या जेवणाच्या डब्याची व्यवस्था केली जाते.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT