Abdul Sattar
Abdul Sattar  Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar News : काँग्रेसचा विरोध डावलून सत्तारांनी केले अल्पसंख्याक आयुक्तालयाचे उद्घाटन..

Jagdish Pansare

Chhatrpati Sambhajinagar News : देशातील पहिले अल्पसंख्याक आयुक्तालाय छत्रपती संभाजीनगरात सुरू होत आहे. पण काही जण हज हाऊसच्या हाॅलमध्ये सुरू करण्यात येणाऱ्या तात्पुरत्या अल्पसंख्याक आयुक्तालयावरून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. हज हाऊसमध्ये बुधवारी उद्घाटन करण्यात येत असलेले अल्पसंख्याक कार्यालय हे तात्पुरत्या स्वरुपाचे असून लवकरच परिसरात असलेल्या चार एकर जागेवर चाळीस कोटी रुपये खर्चून चार मजली स्वतंत्र अल्पसंख्याक आयुक्तालयाचे कार्यालय निर्माण करणार असल्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.

अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या हस्ते हज हाऊसमध्ये देशातील पहिल्या अल्पसंख्याक आयुक्तालयाचे उद्घाटन करण्यात आले. काँग्रेससह काही पक्ष, संघटनांनी अल्पसंख्याक आयुक्तालयाचे कार्यालय हज हाऊसमध्ये सुरू करण्यास विरोध दर्शवला होता. (Abdul Sattar News)

बुधवारी उद्घाटनाच्या दिवशी काँग्रेसने (Congress) हज हाऊसच्या बाहेर निदर्शने करत हे कार्यालय इतरत्र सुरू करावे, अशी मागणी करत घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलनकर्त्या काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला.

अब्दुल सत्तार यांनी अल्पसंख्याक आयुक्तालय कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर आपल्या भाषणात विरोध करणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा समाचार घेतला. त्यासोबतच बुधवारी उद्घाटन करण्यात आलेले हे कार्यालय तात्पुरत्या स्वरुपाचे असून लवकरच नव्या चार मजली इमारतीमध्ये ते स्थलांतरित केले जाईल, असे सांगितले. अल्पसंख्याक आयुक्तालय हे अल्पसंख्यांक समाजातील व्यक्तींच्या शिक्षण, रोजगारासह सर्वांगिण विकासासाठी कार्य करेल, असा विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला.

विभागीय आयुक्त दिलीप गावडे, अल्पसंख्यांक आयुक्त मोईन ताशिलदार, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या या उद्घाटन समारंभात सत्तार यांनी या कार्यलायाचे कामकाज कसे चालणार? किती अधिकारी असतील, किती विभाग या कार्यालयात असतील याबद्दल सविस्तर माहिती दिली.

देशातील पहिले अल्पसंख्यांक आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे याचा विशेष आनंद आहे. या आयुक्तालय अंतर्गत अल्पसंख्यांक समाजातील विविध घटकातील लोकांसाठी विविध विकास योजना अंमलबजावणी, पाठपुरावा करून त्यांना वेळीच लाभ देणे शक्य होईल. अल्पसंख्यांक आयुक्तालयामुळे अर्जदाराच्या अर्जावर तात्काळ कारवाई होऊन सर्वसामान्यांना न्याय मिळण्याची प्रक्रिया जलद गतीने होण्यास मदत होईल.

अल्पसंख्यांक विभागाच्या विकासासाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी येथे एक स्वतंत्र विभाग कार्य करणार असल्याचेही सत्तार यांनी सांगितले. रोज शिष्यवृत्ती, रोजगार, उर्दू घर यासारख्या विविध सुविधा या आयुक्तालयामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. संबंधित विविध विभागाचे एकत्रित समन्वयन व शासन व अल्पसंख्यांक विभाग हा सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारा दुवा ठरेल, असा विश्वास सत्तार यांनी यावेळी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT