Abdul Sattar News Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar News: अब्दुल सत्तारांचा डाव फसला,जिल्हा बँकेतील वर्चस्वाला दणका; विद्यमान अध्यक्षांसह दोन्ही मुलांची नावे यादीतून वगळली

Chhatrapati Sambhajinagar District Bank : गेल्या तीन-चार वर्षापासून जिल्हा बँकेवर एकहाती सत्ता राखलेल्या अब्दुल सत्तार यांनी आपल्या समीर आणि आमेर या दोन मुलांना बँकेच्या राजकारणात घुसवण्याचा प्रयत्न केला. परंतु या दोघांच्या मतदार यादीतील समावेश आलेले आक्षेप मान्य करण्यात आले आणि हा डाव फसला.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar District Bank : दहा वर्ष छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संचालक असलेल्या आमदार अब्दुल सत्तार यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला आहे. जिल्हा बँकेच्या जोरावर राजकारणात मोठी झेप घेणाऱ्या सत्तार यांचे पंख छाटण्यात आले आहेत. सहकार कायद्याच्या नव्या नियमानूसार दहा वर्ष संचालक राहिलेल्यांना पुन्हा निवडणूक लढवता येणार नाही या निर्णयाचा फटका सत्तार यांच्यासह खासदार संदीपान भुमरे यांना बसला.

गेल्या तीन-चार वर्षापासून जिल्हा बँकेवर एकहाती सत्ता राखलेल्या अब्दुल सत्तार यांनी आपल्या समीर आणि आमेर या दोन मुलांना बँकेच्या राजकारणात घुसवण्याचा प्रयत्न केला. परंतु या दोघांच्या मतदार यादीतील समावेश आलेले आक्षेप मान्य करण्यात आले आणि हा डाव फसला. अब्दुल सत्तार समर्थकांच्या अनेक नावांवरील आक्षेप मान्य केल्यामुळे विद्यमान अध्यक्ष अर्जून गाढे यांच्यासह समीर सत्तार, आमेर सत्तार यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत.

तर दुसरीकडे भाजपच्या राजकीय डावपेचामुळे मंत्री अतुल सावे, शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, कन्नडच्या शिवेसना आमदार संजना जाधव यांच्या नावावरील आक्षेप मात्र फेटाळण्यात आले. त्यामुळे या नव्या नेत्यांची जिल्हा बँकेच्या राजकारणात एन्ट्री निश्चित समजली जात आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठीच्या जाहीर प्रारुप मतदार यादीवरील आक्षेपांच्या सुनावणीचा निकाल आज जाहीर झाला.

मंत्री अतुल सावे, आमदार संजना जाधव, भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्यावरील आक्षेप फेटाळण्यात आले आहेत. तर आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह त्यांची दोन्ही मुलांची तसेच समर्थक विद्यमान अध्यक्ष अर्जून गाढे यांच्यासंबंधीचे आक्षेप मान्य करत त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. प्रारुप मतदार यादीवर एकूण 47 आक्षेप दाखल झाले होते.

यात सर्वाधिक आक्षेप नावे कमी करण्यासंबंधीचीच होती. त्यातही चर्चित 12 जणांच्या नावांवर आक्षेप घेण्यात आले होते. प्राप्त आक्षेपांवर 11 मे रोजी विभागीय सहनिबंधक कार्यालयात विभागीय सहनिबंधक संतोष बिडवई, सहायक सहनिबंधक किरण चौधरी, तालुका उपनिबंधक विलास कोळेकर यांच्यासमोर सुनावणी झाली होती. याचा निकाल आज दुपारी जाहीर करण्यात आला.

22 आक्षेप मान्य करत संबंधित नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. तर 25 आक्षेप फेटाळत संबंधित नावे यादीत कायम ठेवली आहेत. त्यानुसार आता 21 तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर शासनाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल, अशी माहिती सहायक सहनिबंधक किरण चौधरी यांनी दिली.

या नेत्यांची नावे कायम

कन्नडमधील रिठ्ठीमोहर्डा वि.का.च्या सदस्य तथा आमदार संजना हर्षवर्धन जाधव, देवगिरी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे, सहकार महर्षी अण्णासाहेब पी.के. पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे सभासद प्रतिनिधी असलेले मंत्री अतुल मोरेश्वर सावे, फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण यांच्यावरील आक्षेप फेटाळले असून त्यांची नावे यादीत कायम ठेवली आहेत.

तर माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार, त्यांची मुले समीर आणि आमेर, तसेच सत्तार यांचे खंदे समर्थक असलेले जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष अर्जून गाढे, पैठणचे माजी नगराध्यक्ष जीतसिंग करकोटक, सिल्लोडच्या राजश्री निकम, कन्नडच्या दर्शना राठोड, जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक अजय मोटे यांचा मुलगा आदित्य मोटे यांच्यासह 22 जणांसंबंधीचे आक्षेप मान्य करत त्यांची नावे वैयक्तीक मतदार यादीतून वगळण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT