Sillod-Soygaon Constituency : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मराठावाड्यातील एक आमदार असा आहे, ज्याला युती-महायुती-आघाडी असे कुठलेच बंधन नाही. राज्य पातळीवरील प्रमुख नेत्यांनी कुठलाही निर्णय घेतला तरी स्वत:च्या मतदारसंघाचा निर्णय हे आमदार महोदय म्हणतील तीच पूर्व दिशा असते. मग तो नेतेही बदलू शकत नाहीत. ते आमदार म्हणजे माजी मंत्री अब्दुल सत्तार. मतदारसंघावरील मजबूत पकडीच्या जोरावर सत्तार सगळ्याच राजकीय पक्षाला झुकवत आले आहेत.
नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदेंसह पक्षाच्या कुठल्याही नेत्याला प्रचाराला बोलावले नाही. स्वत: सगळी यंत्रणा हाताळत पाचव्यांदा नगरपालिका एकहाती जिंकली. मुलाला नगराध्यक्ष केलं आणि आता जिल्हा परिषदेसाठी जिल्हा पातळीवर युतीसाठी बैठका सुरू असताना सत्तार यांनी पुन्हा सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात आपण स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली.
शिवसेनेत येण्यापूर्वी अब्दुल सत्तार हे काँग्रेस पक्षात होते. याच पक्षाकडून ते आमदार, मंत्री झाले. संघटनेतही त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद होते. त्यामुळे काँग्रेस पक्षातील जिल्हा पातळीवरील निर्णयात त्यांनी कधी वरिष्ठ नेत्यांना हस्तक्षेप करू दिला नाही. 100 टक्के रिझल्टची खात्री असल्याने नेत्यांनीही सत्तार यांचा शब्द कधी खाली पडू दिला नाही. एखादा निर्णय विरोधात गेला की लगेच बंड करण्याचा सत्तार यांचा स्वभाव असल्याने नेतेही त्यांच्यापासून अंतर राखून असतात.
2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत सुभाष झांबड यांच्या उमेदवारीला सत्तार यांनी जाहीर विरोध केला होता. पक्षाने निर्णय बदलाला नाही तर सत्तार यांनी काँग्रेस पक्षच बदलला. एवढेच नाही तर काँग्रेस जिल्हा कार्यालयातील खुर्च्या या आपण स्वतःच्या पैशातून आणल्या म्हणत त्याही नेल्या. राजकारणात मनाविरुद्ध घडले तर सत्तार कोणत्याही थराला जाऊ शकतात हे अनेकदा दिसून आले आहे.
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर विधानसभेसाठी भाजप प्रवेशासाठी भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. पण तालुक्यातून टोकाचा विरोध झाल्यानंतर नेत्यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासाठी भाजपने जागाही सोडली. निवडून आल्यावर महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना उद्धव ठाकरेंनी राज्यमंत्री पदही दिले. कॅबिनेटची आशा असल्यामुळे नाराजीतूनच त्यांनी ते स्वीकारले. पण त्यांची महत्वकांक्षा त्यांना शांत बसू देत नसल्याने त्यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडात सहभागी होत ठाकरेंना जय महाराष्ट्र केला.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सत्तार यांची कॅबिनेटपदी बढती झाली. पण सत्तेचा गैरवापर, अधिकाराच्या बाहेर जाऊन निर्णय घेणे, वादग्रस्त विधाने यामुळे ते राज्यभरात चर्चेत राहिले. राज्यात सत्तांतर होऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर सत्तार यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. तेव्हापासून नाराज असले तरी एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्तार कायम आहेत. परंतु मतदारसंघाशिवाय संघटनात्मक कामातून त्यांनी गेल्या वर्षभरापासून पूर्णपणे अंग काढून घेतले आहे.
नगरपालिका, नगर पंचायत असो की मग आता जिल्हा परिषदेची निवडणूक पक्षाचे कुठलेच आदेश सत्तार यांना बंधनकारक नसतात. त्यामुळे जिल्हा परिषदेत भाजपसोबत युतीच्या बैठका सुरू असताना सत्तार यांनी त्याकडे पाठ फिरवत मतदारसंघात आपण स्वबळावरच लढणार असल्याचे जाहीर करून टाकले. सोयगावलाच लागून असलेल्या कन्नड मतदारसंघातही सत्तार वेगळा प्रयोग करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी कन्नडच्या आमदार संजना जाधव यांनी नुकतीच सत्तार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटही घेतली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.