Chhatrapati Sambhajinagar : राज्याचे अल्पसंख्याक विकास तथा पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात झालेल्या फेरबदलानंतर सत्तार यांच्याकडून कृषी खात्याचा पदभार काढून घेत त्यांच्याकडे अल्पसंख्याक विकास व पणन खात्याचा कारभार सोपवण्यात आला होता. या खात्याचे मंत्री झाल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी राज्यात स्वतंत्र अल्पसंख्याक आयुक्तालय व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू केले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्याशी असलेले चांगले संबंध आणि सातत्याने पाठपुरावा करत सत्तार यांनी हे विभागीय अल्पसंख्याक आयुक्तालय संभाजीनगरमध्ये मंजूर करून घेतले होते. या आयुक्तालयाचे तात्पुरते कार्यालय हज हाऊसमध्ये येत्या 26 जूनपासून सुरू करण्यात येत आहे. खासदार संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत अब्दुल सत्तार यांच्या हस्ते अल्पसंख्याक आयुक्तालयाचे उद्घाटन बुधवारी दुपारी चार वाजता करण्यात येणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तार Abdul Sattar यांचा हा मास्टर स्ट्रोक असल्याचे बोलले जाते. महाराष्ट्र शासनामार्फत अल्पसंख्यांक विभागाला स्वतंत्र आयुक्तालय मंजूर करण्यात आले होते. हज हाऊस मधील हॉलमध्ये तात्पुरत्या स्वरूपात या कार्यालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिले अल्पसंख्यांक आयुक्त म्हणून मो.बा. ताशीलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हे आयुक्तालय हज हाऊसमधील प्रार्थना हॉलमध्ये होणार असल्याची अफवा काही दिवसांपासून पसरविण्यात आली होती. परंतु हे कार्यालय हज हाऊसमध्ये रिकाम्या असलेल्या हॉलमध्ये तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यालयामुळे अल्पसंख्याक समुदायाला दाद मागण्यासाठी मुंबई किंवा मंत्रालयात धाव घेण्याची आता गरज भासणार नाही. त्यांच्या समस्यांचे संभाजीनगर येथील कार्यालयातूनच निराकरण केले जाणार आहे.
सिल्लोडमध्ये दहा कोटींची विकासकामे..
इकडे संभाजीनगरात विभागीय अल्पसंख्याक कार्यालय सुरू करत असतानाच अब्दुल सत्तार यांनी आपल्या सिल्लोड-सोयगांव विधानसभा मतदारसंघातही विकासकामांच्या उद्घाटन आणि भुमीपूजनाचा धडाका लावला आहे. सिल्लोड शहरातील रस्ते तसेच भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी सत्तार यांनी दहा कोटींचा निधी दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांना या तिघांचे आभार मानले आहेत. येत्या शंभर दिवसांत सिल्लोड शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण होऊन ते चकचकीत होतील, असा विश्वास सत्तार यांनी नागरिकांना दिला. भूमिगत गटार या महत्वकांक्षी योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ही योजना कार्यान्वित होईल, असे आश्वासन सत्तार यांनी दिलेले आहे.
याशिवाय नगर परिषद प्रशाला इमारत, नाट्यगृह, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पोलिस स्टेशन, शासकीय कर्मचाऱ्यांसाठीचे निवासस्थान शहरात लवकरच उभारण्यात येणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणूक पाहता सत्तारांचा हा निवडणूक धमाका असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.