Abdul Sattar Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar : पालकमंत्रिपदाचा पदभार स्वीकारताच अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; ‘नव्वद दिवसांत...’

Chhatrapati Sambhajinagar Guardian Minister : पाच वेळा मंत्री झालो होतो. मात्र, पालकमंत्रिपद मिळाले नव्हते. आता मी संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. पूर्वीचे पालकमंत्री हे औरंगाबादचे पालकमंत्री होते. संभाजीनगरचे नेतृत्व करण्याची संधी मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी दिली.

Vijaykumar Dudhale

Chhatrapati Sambhajinagar, 26 July : संभाजीनगर शहराला दररोज कमीत कमी तीन तास पिण्याचे पाणी मिळायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला 135 लिटर याप्रमाणे पाणी मिळावे, यासाठी पुढील 90 दिवसांत खारीचा वाटा उचलून संभाजीनगरची पाणी योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे नूतन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच छत्रपती संभाजीनगर शहरात आले होते. त्या वेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. संभाजीनगरमध्ये दाखल झाल्यानंतर माध्यमाशी बोलताना सत्तार यांनी संभाजीनगर शहराच्या पाणी योजनेबाबत भाष्य केले.

ते म्हणाले, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मी गेली अनेक वर्षे राजकारण करीत आहे. पाच वेळा मंत्री झालो होतो. मात्र, पालकमंत्रिपद मिळाले नव्हते. आता मी संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. पूर्वीचे पालकमंत्री हे औरंगाबादचे पालकमंत्री होते. संभाजीनगर जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी दिली.

मला खेळण्यासाठी कमी ओव्हर मिळाल्या आहेत. मात्र, या कमी ओव्हरमध्ये संभाजीनगर शहर, जिल्ह्याचे आणि अनेक तालुक्यांचे वेगवेगळे प्रश्न सोडविण्याला माझे पहिले प्राधान्य राहील. केंद्र आणि राज्य सरकारकडे संभाजीनगरचा थकीत निधी आणण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदासाठी भाजपनेही फिल्डिंग लावली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पत्र देण्यात आले होते. मात्र, शेवटी तुमीच बाजी मारली, यावर पालकमंत्री सत्तार म्हणाले, संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये कोणताही वाद नव्हता.

संभाजीनगरचे पालकमंत्रिपद हे शिवसेनेचे होते. पूर्वीही ते शिवसेनेकडे होते. आताही संदीपान भूमरे हे शिवसेनेचेच पालकमंत्री होते. संभाजीनगरचे पालकमंत्रिपद भाजपलाही दिले असते तर आम्हाला तेवढाच आनंद झाला असता. कारण, महायुतीचे सरकार असून आमच्यात कोणताही वादविवाद नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जबाबदारी दोन्ही उपमुख्यमंत्री शिवसेना आणि भाजपचे जिल्ह्यातील सर्व आमदार यांच्याशी चर्चा करूनच दिली आहे. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊनच मी काम करणार आहे. शेवटी मी एकटा काही करू शकत नाही. पण कार्यकर्ता या नात्याने कुठेही कमी पडणार नाही, असेही अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही

सत्तार म्हणाले, संभाजीनगरचे पहिले अल्पसंख्याक पालकमंत्री म्हणून मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संधी दिली. सर्व जातीधर्माला बरोबर घेऊन काम करत या संधीचे सोने करण्याची माझी जबाबदारी आहे. पालकमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी मला काँग्रेसमध्ये असतानाही मदत केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवूनच मी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांच्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT