Devendra Fadnavis-Abhimanyu Pawar Sarkarnama
मराठवाडा

MLA Abhimanyu Pawar: दुसरा विजय मिळवला अन् अभिमन्यू पवारांना फडणवीसांकडून 'जादू की झप्पी'..

Abhimanyu Pawar's second consecutive victory, Fadnavis happy : फडणवीसांच्या या पठ्ठ्याने विरोधकांसह पक्षांतर्गत विरोधकांनी त्यांच्या भोवती रचलेले चक्रव्यूह भेदत मात दिली. सलग दुसरा विजय मिळवत पवार यांनी फडणवीसांना खूष करुन टाकले.

Jagdish Pansare

जलील पठाण

औसा : विधानसभा निवडणुकीच्या निकालाने महायुतीच्या गोटात सध्या उत्साहाचे वातावरण आहे. सगळ्या एक्झीट पोलचा अंदाज फोल ठरवत `अब की बार दोनशे पार` पोचल्यानंतर आता सगळ्याच्या नजरा लागल्या आहेत, त्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणाऱ्या मंत्रीमंडळाकडे. विधानसभेच्या औसा मतदारसंघातून भाजप महायुतीचे अभिमन्यू पवार सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. या विजयाचा आनंद त्यांनी मुंबईत आपले नेते आणि राजकारणातील गाॅडफादर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

आपल्या शिष्याने सलग दुसरा विजय मिळवल्याचा फडणवीस यांना देखील इतका आनंद झाला, की त्यांनी अभिमन्यू पवार यांना मिठीच मारली. (Abhimanyu Pawar) आता ही `जादू की झप्पी` अभिमन्यू यांना मंत्री करणारी ठरते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अभिमन्यू पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधील सौख्य अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासातले आणि निष्ठावान म्हणून अभिमन्यू पवार ओळखले जातात.

फडणवीसांच्या या पठ्ठ्याने विरोधकांसह पक्षांतर्गत विरोधकांनी त्यांच्या भोवती रचलेले चक्रव्यूह भेदत मात दिली. सलग दुसरा विजय मिळवत पवार यांनी फडणवीसांना (Denvendra Fadnavis) खूष करुन टाकले. फडणवीसही अभिमन्यू पवारांना आता नामदार केल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास त्यांच्या समर्थकांना वाटतो. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडे असलेला हा मतदारसंघ आपल्या शिष्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून सोडवून घेतला.

त्यावेळी त्यांच्या उमेदवारीला भाजपमधूनच तीव्र विरोध झाला होता. भूमीपुत्रच उमेदवार असावा यासाठी अभिमन्यू पवारांपुढे अडचणींचा डोंगर उभा केला गेला. एकीकडे दोन वेळा निवडून आलेले काँग्रेसचे आमदार बसवराज पाटील मजबूत पाय रोवून त्यांच्यापुढे उभे होते. तर दुसरीकडे भाजपमधील अंतर्गत विरोधामुळे अभिमन्यू पवार अडचणीत सापडले होते. पण या सगळ्यांवर मात करत अभिमन्यू पवार यांनी त्यावेळी मिळवलेला विजय हा साधा नव्हता. या विजयाने पवार यांच्यातील प्रशासकीय आणि राजकारणाच्या आखाड्यात उतरून मैदान मारण्याचे कौशल्यही असल्याचे सिद्ध झाले होते.

बलाढ्य समजल्या जाणाऱ्या बसवराज पाटलांचा त्यांनी सत्तावीस हजारांनी पराभव केला होता. पक्षफुटीनंतर महायुतीचे सरकार आले. या काळात त्यांनी आपले वजन वापरत मतदारसंघात तीन हजार कोटींच्या वर निधी मंजूर करून घेतला. शेतरस्ते, मनरेगातुन ग्रामसमृद्धी सारखे लोकोपयोगी योजना राबवत आपले रिपोर्ड कार्ड भरगच्च केले. शेतरस्त्याचा जनक म्हणून राज्यभर ओळख निर्माण केली. 2024 च्या निवडणुकीत पुन्हा अभिमन्यू पवार यांच्यासाठी चक्रव्यूह रचण्यात आले, विरोधकांना भाजपमधील काही `घर का भेदी`नी रसद पुरवली.

पण पुर्वीचा अनुभव गाठीशी असलेल्या अभिमन्यू यांनी यावेळी स्वतःच किल्ला लढवला आणि विजयाच झेंडाही फडकवला. एकीकडे जरांगे फॅक्टर, भाजपावर नाराज मुस्लिम मतदार आणि मराठा मतदारात पडलेली फूट असे समीकरण त्यांच्या विजयात अडथळा ठरणार, असे चित्र होते. पण ते अभिमन्यू पवार यांनी नियोजनपद्ध प्रचार आणि विरोधकांना धोबीपछाड देणारे डाव या जोरावर बदलले. फडणवीसांनी दुसरा विजय मिळवणाऱ्या आपल्या शिष्याची गळा भेट घेतली, आता त्यांच्यावर नवी जबाबदारी ते टाकतात का? की इथेही अभिमन्यू पवार यांना जिल्ह्यातील स्पर्धक पक्षातील नेत्यांशीच पुन्हा संघर्ष करावा लागतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT