Adarsh Society Scam News Sarkarnama
मराठवाडा

Adarsh Society Scam : 'आदर्श'च्या ठेवीदारांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या; विभागीय आयुक्त कार्यालयात तणाव

Adarsha Patsanstha Scam and Divisional Commissioner Office : विभागीय आयुक्त कार्यालयात तणाव, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News: आदर्श सहकारी पतसंस्थेतील घोटाळा उघडकीस येऊन आठ महिने उलटले. चाळीस हजाराहून अधिक ठेवीदारांच्या घामाच्या कोट्यावधीच्या ठेवी यात अडकल्या. आयुष्यभराची कमाई बुडाली या धसक्याने अनेकांचा मृत्यू झाला, तर काहींनी आपले आयुष्य संपवले. संचालक मंडळावर कारवाई झाली, काही संचालक जेलमध्ये आहेत, सहकार निबंधक कार्यालयाने पतसंस्थेच्या मालकीच्या मालमत्ता जप्त केल्या. पण एवढे करूनही ठेवीदारांना अद्याप एक छदामही मिळाला नाही. (Adarsh Society Scam)

आठ महिन्यांपासून आपल्या हक्काचे, कष्टाचे पैसे परत मिळतील या आशेवर असलेल्या हजारो ठेवीदारांच्या संयमाचा अंत झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. या प्रश्नाला वाचा फोडून ठेवीदारांना हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी 'एमआयएम'चे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. हजारो ठेवीदार, महिला, पुरूष, वृध्द आपल्या मुला-बाळांसह आंदोलनात सहभागी झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इम्तियाज जलील व आंदोलकांनी विभागीय आयुक्तांनी भेटून आमचे म्हणणे ऐकून घ्यावे, तसचे भ्रष्टाचार करणाऱ्या संचालक मंडळावर कारवाई करून आमचे पैसे परत कधी करणार, याचे लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी हे आंदोलक करत होते. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने होणार हे माहित असल्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दुपारपासून आंदोलन करणाऱ्या ठेवीदारांना भेटण्यासाठी विभागीय आयुक्त आलेच नाही. अखेर सायंकाळी संयम सुटलेल्या आंदोलकांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेट ओलांडून विभागीय आयुक्त कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलासांशी त्यांची झटापट झाली, आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांनी बळाचा वापर केला. आत घुसलेल्या आंदोलकांना रोखण्यासाठी चार ते पाच अश्रधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे एकच गोंधळ उडाला. इम्तियाज जलील यांच्यासह अनेक आंदोलकांना यामुळे त्रास व्हायला लागला.

आयुक्त कार्यालयाच्या पायऱ्याजवळ इम्तियाज जलील यांना बसवून आंदोलकांनी त्यांचे डोळे पुसले. घबराट होत असल्यामुळे अनेकांनी आपल्या हातातील कागद, रुमालाने त्यांना वारे घालत शांत केले. पोलिसांनी बळाचा वापर केल्यानंतरही सगळे आंदोलक विभागीय आयुक्त कार्यालयात घुसल्याने मोठा तणाव निर्माण झाला. इम्तियाज जलील हेही आक्रमक झाले. आम्हाला रोखण्यासाठी शहरातील सतरा पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना इथे बोलावण्यात आले. पण आम्ही इथून हटणार नाही.

विभागीय आयुक्त स्वतःला राजे समजतात का ? स्वतः एसी केबीनमध्ये बसून अधिकाऱ्यांना पुढे करतात. पण आम्हीही ते समोर आल्याशिवाय आणि आम्हाला लेखी आश्वासन दिल्याशिवाय इथून हटणार नाही, असा आक्रमक पावित्रा घेतला. पाच मिनिटात विभागीय आयुक्त भेटायला आले नाही, तर आम्ही सगळे त्यांच्या दालनात घूस, मग त्याची पुढील जबाबदारी पोलिसांची असेल, असा इशाराही इम्तियाज जलील यांनी दिला. अजूनही आंदोलक विभागीय आयुक्तालयात ठाण मांडून आहेत. पोलिस इम्तियाज जलील व आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असून पोलिसांनी बळाचा वापर केल्यामुळे वातावरण चिघळले आहे.

दरम्यान, आदर्श पतसंस्थेमध्ये 54 हजार 128 ठेवीदारांच्या एकूण 353.58 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. यामध्ये 25 हजार रुपये ठेवी असलेल्यांची संख्या ही 36 हजार 781 इतकी आहे. संस्थेच्या मालकीच्या दोन मालमत्ता असून त्यांची किंमत अनुक्रमे 8.5 कोटी, 3.5 कोटी रुपये इतकी आहे. बाजारभावाप्रमाणे मालमत्तांची स्वतंत्र विक्री करण्यात येणार असून त्यातून ठेवीदारांचे पैसे परत दिले जाणार होते.

परंतु या मालमत्ता घेण्यास कुणीच पुढे न आल्यामुळे हा प्रश्न कायम आहे. आदर्श नागरिक पतसंस्थेमध्ये एकूण कर्जदारांची संख्या 1190 असून त्यापैकी पाच लाखापर्यंत कर्ज असलेल्या कर्जदारांची संख्या 1662 इतकी आहे. पाच लाखावरील कर्जदारांकडून 21.56 कोटी आणि पाच लाखांवरील 328 कर्जदारांकडून 250 .95 कोटी येणे बाकी आहे. या पतसंस्थेत 40 हजारांहून अधिक ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या आहेत. संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर सहकार विभागाने ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवून देण्यासाठी कारवाई सुरू केली आहे.

आदर्श पतसंस्थेत लाखोंच्या ठेवी बुडाल्यामुळे हवालदिल झालेल्या काही ठेवीदरांनी आत्महत्या केल्या, तर काहींचा धसका घेतल्यामुळे मृत्यू झाला आहे. याआधी शहरात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठीकवर देखील आदर्शच्या ठेवीदारांनी मोर्चा काढला होता. तेव्हाही पोलिसांनी बळाचा वापर केला होता. तेव्हा संबंधित मंत्र्यांनी मोर्चाला समोर जात कारवाई आणि तीन महिन्यात पैसे परत करण्याची कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र तेही हवेत विरले.

(Edited By-Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT