MP Imtiaz Jalil Sarkarnama
मराठवाडा

Adarsha Patsanstha Scam : छत्रपती संभाजीनगरातील आदर्श नागरी पतसंस्थेचा घोटाळा पोहोचला संसदेत!

Mayur Ratnaparkhe

Chhatrapati Sambhajinagar News : सहा महिन्यांपूर्वी उघडकीस आलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्था घोटाळा गुरुवारी संसदेत पोहोचला. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आदर्शसह मुंबई व राज्यातील विविध पतसंस्था, नागरी सहकारी बँकांमधील तब्बल दोन हजार कोटींच्या ठेवी धोक्यात असल्याचा मुद्दा उपस्थित केला.

आरबीआयचे कुठलेही नियंत्रण या नागरी पतसंस्थांवर नसल्यामुळे त्या मोकाट सुटल्या आहेत. तब्बल दोन हजार कोटींचा घोटाळा या पतसंस्थांच्या माध्यमातून झाला असून माजी सैनिकांसह गोरगरीब महिला, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा पैसा या पतसंस्थांमध्ये अडकला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संचालक मंडळ आणि सहकार विभागातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने झालेल्या या घोटाळ्याप्रकरणी आरोपींवर तात्काळ कारवाई करावी तसेच सहा महिन्यात या सर्व ठेवीदारांना त्यांचे पैसे परत द्यावेत, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली.

छत्रपती संभाजीनगर शहरातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्था, देवाई, ज्ञानोबा यासह मुंबई व राज्यातील अनेक पतसंस्थांमध्ये घोटाळे झाले असून सर्वसामान्यांच्या लाखोंच्या ठेवी धोक्यात आल्या आहेत. एकट्या आदर्श नागरिक सहकारी पतसंस्थेच्या 62000 ठेवीदारांच्या ठेवी अडकल्यामुळे अनेकांनी निराशेतून आत्महत्यांसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. या सर्व नागरी सहकारी पतसंस्था व बँकांवर रिझर्व बँकेचे नियंत्रण असावे, अशी मागणीही इम्तियाज जलील यांनी केली.

छत्रपती संभाजीनगर शहरातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचा घोटाळा गेल्या काही महिन्यांपासून गाजतो आहे. काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर मध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली ठेवीदारांचा मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा सहकार मंत्र्यांनी महिनाभरात ठेवीदारांच्या रकमा परत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही या ठेवीदारांना दिलासा मिळालेला नाही. इम्तियाज जलील यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित करत पतसंस्थेतील गैरप्रकार व घोटाळ्यांकडे केंद्र सरकारचेही लक्ष वेधले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT