Aditya Thackeray visited drought-hit farmers Sarkarnama
मराठवाडा

Aditya Thackeray : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढून सरकारला जाब विचारणार; मराठवाडा दौऱ्यात आदित्य ठाकरेंचा इशारा

Aditya Thackeray Marathwada visit: आदित्य ठाकरे यांनी वैजापूर आणि कन्नड तालुक्यांतील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी सरकारविरोधात मोठा मोर्चा काढण्याचा इशारा दिला.

Jagdish Pansare

Marathwada Drought News: राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना सरकारने त्याला वाऱ्यावर सोडले आहे. अतिवृष्टी, पीक विमा, नुकसानभरपाई आणि कर्जमाफी यापैकी कोणत्याही बाबतीत शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. सरकारने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदतही अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांची दिवाळी होणार आहे का? असा सवाल शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारला केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्यासाठी मोठा मोर्चा काढणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

मराठवाड्यासह राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. अशात शेतकऱ्यांना भरीव मदत देऊन दिलासा देण्याची आवश्यकता असताना सरकारने त्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये देण्याची घोषणा देऊन बोळवण केली. दिवाळी दोन दिवसांवर आलेली असताना अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारी मदत पोहचलेली नाही. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात गारज व कन्नड तालुक्यातील जेहूर गावातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली.

आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष शेतातील सोयाबीन, तूर, मूग आणि कापूस पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, नुकसान आणि व्यथा जाणून घेतल्या. तसेच सरकारने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत खात्यात जमा झाली का? याची शहानिशाही केली. गारज येथील तरुण शेतकरी कडुबा त्रिभुवन यांनी आपली व्यथा मांडताना शेतीतील नुकसानीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाची माहिती दिली. मुलींची दिवाळी कशी करायची, त्यांना दिवाळीसाठी माहेरी आणायचे कसे, असा प्रश्न आमच्यासमोर उभा आहे.

मुलींना माहेरी आणण्याचीही भीती वाटत असल्याची भावनिक व्यथा या शेतकऱ्याने मांडली. सरकारने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत म्हणजे 'लबाडाचे आवतन' ठरल्याची टीकाही शेतकऱ्यांनी केली. मागील वर्षीचा पीक विमा, अतिवृष्टीची नुकसानभरपाई आणि जाहीर केलेली ३२ हजार कोटी रुपयांची मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. कर्जमाफीच्या यादीत नाव येऊनही प्रत्यक्ष कर्जमाफी मिळत नसल्याची परिस्थिती आहे.

पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी होणार? राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असताना प्रत्यक्ष मदत मात्र मिळत नाही. राज्यात आणि केंद्रात एकाच विचाराचे सरकार असतानाही शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याची टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कार्यक्रमांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असताना संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मात्र मदतीसाठी वाट पाहावी लागत आहे.

महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत बिकट असून दुष्काळावर केवळ घोषणा करून चालणार नाही, तर ठोस कृती करणे आवश्यक आहे.शेतकऱ्यांनी आता एकजूट होऊन आपल्या हक्कासाठी आवाज उठवण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्यासाठी मोठा मोर्चा काढण्यात येईल. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT