AIMIM leader Imtiaz Jaleel and Shiv Sena (UBT) leader Ambadas Danve during a political interaction, amid debate over the mayoral post in the municipal corporation. Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve : एमआयएमचा महापौर कसा होणार? इम्तियाज जलील यांचा दावा दानवेंनी फेटाळला!

Imtiaz Jaleel vs Ambadas Danve : संजय शिरसाट यांनी महापालिका निवडणुकीआधी सातत्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि एमआयएम युती करणार, असा दावा केला होता. मध्यंतरीच्या काळात अंबादास दानवे-इम्तियाज जलील यांची जोडी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याविरोधात एकत्र आल्याचे दिसून आले होते.

Jagdish Pansare

Shivsena UBT- Aimim News : 'राजकारणात सगळं काही शक्य आहे, महापौर पदाच्या निवडणुकीत आम्ही भाजपला धक्का देऊ', असे सांगत 33 नगरसेवक असलेल्या एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महापौर पदावर दावा सांगितला. भाजपला रोखण्यासाठी आम्ही कोणासोबतही जाऊ शकतो, महापौर पदासाठी पाठिंबा देऊ किंवा घेऊ शकतो, असे म्हणत एमआयएमने खळबळ उडवून दिली.

मात्र ज्या पक्षांना गृहित धरून इम्तियाज बोलत आहे, त्यापैकीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी एमआयएमचा हा दावा खोडून काढला आहे. एमआयएमचे 33 नगरसेवक निवडून आले आहेत. भाजप बहुमताजवळ आहे, त्यामुळे त्यांना महापौर बसवण्यात कुठलीही अडचण दिसत नाही. अशावेळी एमआयएमचा महापौर कसा होणार? मला वाटत मतदारांचा कौल आपण स्वीकारला पाहिजे.

लोकांनी भाजपला निवडून दिले आहे, लोकशाहीत आपण हे मान्य केले पाहिजे, असे मला वाटते, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी इम्तियाज जलील यांनी केलेला दावा आणि शक्यता फेटाळून लावल्या. एमआयएमने किंवा इतर पक्षाने महापौर पदासाठी प्रयत्नही करू नयेत, असा सल्लाही दानवे यांनी या निमित्ताने दिला आहे.

शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी महापालिका निवडणुकीआधी सातत्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि एमआयएम युती करणार, असा दावा केला होता. मध्यंतरीच्या काळात अंबादास दानवे-इम्तियाज जलील यांची जोडी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याविरोधात एकत्र आल्याचे दिसून आले होते.

विशेषतः शिरसाट यांच्यावर जेव्हा हॉटेल खरेदी, एमआयडीसीचा प्लाट, आरक्षित भूखंड, शहरातील मोक्याच्या जागेवरी प्लॉट खरेदी प्रकरणावरून आरोप झाले होते, तेव्हा इम्तियाज जलील हे सगळे पुरावे घेऊन अंबादास दानवे यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन भेटले होते. या दोघांमधील वाढती जवळीक तेव्हा चर्चेचा विषय ठरली होती.

दोघांमध्ये चांगले संबंध असले तरी महापौर पदावरून इम्तियाज जलील यांनी केलेला दावा काही दानवे यांना पटला नाही. या संदर्भात जेव्हा त्यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी एमआयएमचा महापौर किंवा काही वेगळं घडवण्यासाठी भाजपाविरोधी पक्ष एकत्र येण्याची कुठलीही शक्यता नसल्याचे स्पष्ट केले. मतदारांनी दिलेला कौल मान्य केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी इम्तियाज जलील यांनाही दिला आहे.

भाजपाचा मार्ग मोकळा...

महापालिकेतील भाजपा आणि शिवसेना या महायुतीतील घटक पक्षांच्या महापालिकेतील एकत्रित नगरसेवकांची संख्या ही 70 म्हणजेच बहुमतापेक्षाही 12 ने जास्त आहे. त्यामुळे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी धक्का देण्याचा जो दावा केला आहे, तो फोल ठरण्याचीच अधिक शक्यता आहे.

राज्यात युती असल्यामुळे शिवसेना महापालिकेत कुठलीही वेगळी भूमिका घेऊ शकत नाही. एमआयएमला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, वंचित आघाडीचे नगरसेवक सोबत घेऊनही बहुमतासाठीची मॅजिक फिगर गाठता येणार नाहीये. त्यामुळे इम्तियाज जलील यांचा दावा हा केवळ चर्चेत राहण्यासाठी केलेला प्रयोग असल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT