Ajit Pawar Memory News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे फुलंब्रीशी नाते केवळ राजकीय दौऱ्यापुरते मर्यादित नव्हते, तर ते रक्ताच्या नात्यांनी, संस्कारांनी आणि आपुलकीने घट्ट विणलेले होते. सत्तेच्या उच्च पदावर असतानाही अजित दादांनी कुटुंब, नाती आणि माणुसकी यांना नेहमीच अग्रक्रम दिला. फुलंब्रीतील त्यांची मावशी सुषमा शंकरराव देशमुख आणि मावसभाऊ नितीन देशमुख यांच्याशी असलेले हे जिव्हाळ्याचे संबंध आजही अनेकांच्या स्मरणात आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथे मुक्कामी असतानाही अजित दादांनी कधीही हॉटेलमधील जेवणाला प्राधान्य दिले नाही. नितीन देशमुख यांच्या घरून आवर्जून डब्बा अजित दादांसाठी पाठवला जायचा. 'दादांना घरचं अन्नच हवं असायचं',असे सांगताना नितीन देशमुख भावुक झाले. या साध्या पण अर्थ पूर्ण सवयीमुळे मावसभावाचे ऋणानुबंध अधिकच दृढ झाले होते. छत्रपती संभाजीनगर शहरात आगमन झाल्यानंतर अजित दादा आवर्जून फुलंब्रीत येत असत.
मावशी सुषमा देशमुख यांची भेट, त्यांच्या तब्येतीची आपुलकीने चौकशी आणि कुटुंबीयांशी मनमोकळा संवाद हा त्यांच्या दौऱ्याचा अविभाज्य भाग असायचा. छत्रपती संभाजीनगरहून जळगावकडे प्रवास असो किंवा अन्य कोणताही दौरा, वेळ मिळाला की अजित दादा मावशीच्या घरी थांबायचे. राज्याचे उपमुख्यमंत्री असूनही मावशीच्या घरी पोहोचल्यानंतर अजित दादा आधी मावशीच्या पाया पडायचे, मगच पुढील चर्चा सुरू व्हायची.
'दादा मावशींना खूप मान द्यायचे', हे सांगताना नितीन देशमुख यांचा कंठ दाटून आला. अनेकदा अजित दादा मावशीना, 'मावशी, तुम्ही बारामतीला या, आमच्याकडेच राहा', असा प्रेमळ आग्रह धरायचे.
आज या आठवणींना उजाळा देताना नितीन देशमुख अक्षरश: भावुक झाले. बोलताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. सत्ता, प्रतिष्ठा आणि व्यस्ततेच्या पलीकडे जाऊन नाती जपणारा, माणुसकीची ऊब जिवंत ठेवणारा नेता म्हणून अजित पवार यांची फुलंब्रीशी असलेली ही नाळ कायम स्मरणात राहणारी आहे.
फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथे प्रचारासाठी नारळ फोडताना एक फोन आला आणि तेव्हा समजले दादांचा अपघात झाला आणि दादा राहिले नाहीत. हे शब्द माझ्या कानावर पडल्यानंतर काही वेळ सुचलेच नाही आणि विश्वासही बसला नाही. मात्र सहकाऱ्यांनी त्याचवेळी गाडी काढून आम्ही थेट संभाजीनगर गाठले आणि तिथून बारामतीला आल्याचे अजित दादांचे मावस भाऊ नितीन देशमुख यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.