Yogesh kshirsagar Ajit Pawar NCP-BJP Sarkarnama
मराठवाडा

Ajit Pawar News : 'तू काय एकटा मालक झाला का?' अजितदादांनी भरसभेत बीडमधल्या नेत्याला झापझाप झापलं...

Ajit Pawar On Yogesh Kshirsagar : बीडमधील सभेत अजित पवारांनी एका स्थानिक नेत्याला उद्देशून “तू काय एकटा मालक झाला का?” अशी कडक शब्दात फटकारले. या वक्तव्याची महाराष्ट्रात जोरदार चर्चा.

Rashmi Mane

बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत सत्तेची लढाई चांगलीच तापली असून उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार स्वतः प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. पहिल्याच जाहीर सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या योगेश क्षीरसागर यांच्यावर थेट टीका केली. क्षीरसागरांना 35 वर्षे संधी मिळाली, पण अपेक्षित विकास झाला नाही. त्यांना तुम्ही 35 वर्षे पालिकेची सत्ता दिली आता तुम्ही मला फक्त पाच वर्षे नगर पालिका ताब्यात द्या, मी बीडमध्ये झालेल्या सर्व उणिवा भरून काढीन, असे आश्वासन अजित पवारांनी सभेत दिले.

याच दरम्यान सभेमध्ये अजित पवारांनी क्षीरसागर यांच्यावर आणखी एक आरोप केला. 53 उमेदवारांसाठी एबी फॉर्म पाठविण्याचा हट्ट त्यांनी धरला, पण पक्षाचा सर्व निर्णय घेण्याचा अधिकार एका व्यक्तीकडे नसतो, असे ते म्हणाले. हे तुझ्या काकांच्या हक्काचे घर नाही, तू काय पक्षाचा मालक झाला का?, असा टोला लगावत त्यांनी क्षीरसागर यांना भर सभेत सुनावले.

अजित पवार म्हणाले, बीड शहर सर्व धर्मभाव जपणारे आहे, सर्व जातीधर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. अनेक वर्षे एका कुटूंबाची सत्ता बीड नगर परिषदेवर होती परंतु त्यांनी काही चांगले काम केले नाही. 'जाऊ तिथे खाऊ' हे त्यांचे भ्रष्ट धोरण होते. अशा लोकांच्या हातात सत्ता दिली त्यामुळे बीड भकास झाले हे आपल्याला बदलायचे आहे.

कंकालेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार करायचा आहे, इथे ड्रेनेज करायचे आहे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभिकरण करायचे आहे, बीड शहराला स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा देण्यासाठी काम करायचे आहे, महिलांना सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारायचे आहे. सर्वकाही करायचे आहे, त्यासाठी नगर पालिकेची सत्ता तुम्ही आमच्या ताब्यात द्या, टप्प्याटप्प्याने हे काम केले जाईल. आम्ही उभा केलेले उमेदवार निर्व्यसनी व चारित्र्यसंपन्न आहेत, ते चुकीचे काही करणार नाहीत, आम्ही करूही देणार नाहीत, मी वेळोवेळी आढावा घेईन. त्यासाठी तुमची खंबीर साथ आम्हाला हवी आहे. एक हाती सत्ता द्या चांगले काम करून दाखवील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

अजित पवारांच्या या टीकेला योगेश क्षीरसागर यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. आम्ही 35 वर्षांत अनेक विकासकामे केली. शेकडो कोटींचे प्रकल्प पूर्ण केले. सात वेळा निवडून आल्याने जनतेनेही आमच्या कामावर विश्वास दाखवला, असे त्यांनी सांगितले. तसेच अजित पवारांना खालची टोळी मुद्दाम दिशाभूल करत आहे. एबी फॉर्मसाठी आम्ही कुठेही हट्ट धरला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पक्षात मोठी गटबाजी असून त्याची दखल घेतली गेली नाही, असे ते म्हणाले.

दरम्यान, बीड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी 19 उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. या रिंगणात निवृत्त नायब तहसीलदार, डॉक्टर, वकील आणि पदवीधर उमेदवारांचा समावेश आहे. 24 वर्षांची दिव्या स्वामी ही सर्वात तरुण उमेदवार असून ती अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. मात्र अद्याप चिन्ह न मिळाल्याने तिच्यासह इतर अपक्ष उमेदवारांना प्रचारात अडचणी येत आहेत. चिन्ह मिळाल्यानंतर फक्त पाच दिवसांचा कालावधी मिळणार असल्याने मतदारांपर्यंत ओळख पोहोचवणे आव्हानात्मक ठरणार आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीच्या प्रेमलता पारवे या सर्वात ज्येष्ठ उमेदवार आहेत. सर्व पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची लढत बनवली असून अपक्ष उमेदवारांचा निभाव कसा लागतो, हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT